Information Hub

Archive for सप्टेंबर 2009

राजू परुळेकर
वांद्रे-वरळी सेतू समारंभाला मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह अनेक गौण माणसं उपस्थित होती, पण त्यात मुख्य माणसं होती ती सोनिया गांधी आणि शरद पवार. आयुष्यभर आपण शरद पवारांना ‘मराठा स्ट्राँगमन’ या बिरुदावलीने गौरवत आलो. ते आपल्याला शाहू, फुले, आंबेडकर या नावाने गंडवत आले; या गोष्टीचं रहस्य त्या दिवशी उघडकीला आलं. या सागरी सेतूवर त्यादिवशी एका बलदंड मराठय़ाच्या लाचारीची लक्तरं मुंबईच्या अरबी समुद्रावर लोंबणार होती.
शरद पवार यांनी या समारंभात धावत पुढे होऊन या वांद्रे-वरळी सेतूला ‘राजीव गांधी’ यांचं नाव दिलं. एकेकाळी जहागिऱ्या आणि वतनदाऱ्यांसाठी मोगलांचं मराठे कसं लांगुलचालन करत असतील त्याचं मूर्तिमंत चित्र शरद पवारांनी उभं केलं.

पवारसाहेब एवढं करून थांबले नाहीत, तर त्यांनी परत धावत जाऊन राजीव गांधींचा जन्म मूळचा गिरगावातला असल्याने ते मूळचे मुंबईकर- महाराष्ट्रीय असल्याचा, साखर काढून झाल्यावर इथेनॉल काढल्यासारखा खुलासाही केला. हे सारं ऐकताना सोनिया गांधी मनात त्या वेळेच्या मोगलांसारख्या हसत असणार. दुसरीकडे महाराष्ट्राचे केसात सतत हात फिरविणारे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दिल्ली दरबारी निष्ठा राखण्याकरता या पवारांच्या प्रस्तावाला जोरदार आवाजात व तर्कात समर्थन देते झाले. याबद्दल महाराष्ट्रातून फारसा चकार शब्दही निघाला नाही, हे आश्चर्यकारक होतं.
दिल्लीत पवारसाहेब मराठा स्ट्राँगमन म्हणून ओळखले जात. पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार असताना शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्या वेळी एका जाहीर समारंभात जे.आर.डी. टाटांनी भारताचा पंतप्रधान होण्याची क्षमता असलेला भावी पंतप्रधान असा पवारसाहेबांचा उल्लेख केला होता. तेव्हा पवारसाहेब एवढे तरुण होते की ते जवळजवळ पंतप्रधान झालेच असं बऱ्याचजणांना वाटलं. त्यांच्या समाजवादी साथींना आणि फायदाकरू पत्रकारांना तर नक्कीच. धर्मनिरपेक्षतेपासून ते शाहू, फुले, आंबेडकरांपर्यंत साऱ्यांचे ते प्रतीक बनले. पुढे पवारसाहेब पंतप्रधान सोडाच, साधं महाराष्ट्रात दोनतृतीयांश बहुमत आणून सरकार आणू शकले नाहीत; किंबहुना महाराष्ट्रात आपण हव्वा केलेल्या ठाकरे वा पवार या नेत्यांना २८८ मधल्या ६०-७० च्या वर जागा कधीच जिंकता आलेल्या नाहीत. उद्धव व राज ठाकरे किंवा अजित व सुप्रिया पवार (सुळे) यांनी हे लक्षात घेण्यासारखं आहे.
दक्षिण वा उत्तरेकडची अनेक राज्यं अनेक नेत्यांनी दोनतृतीयांश बहुमतांनी एकहाती जिंकताना पाहत असताना आपण पवार-ठाकरेंना महानेते का मानतो, हे आपण लक्षातच घेत नाही! त्याचं सारं उत्तर पवारसाहेबांच्या परवाच्या वांद्रे-वरळी सी-लिंक उद्घाटनाच्या वेळेच्या थिल्लर वर्तनात दडलेलं आहे.
महाराष्ट्राला लोकोत्तर पुरुष-स्त्रियांची मोठी परंपरा आहे, हे पवारसाहेबांना माहीत नसावं. खरंतर वांद्रे-वरळी सेतूसाठी सर्वात अचूक नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, कारण ज्या नेहरूप्रणीत कमिशनने मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, यासाठी जंग जंग पछाडलं होतं, त्यांचं ऑग्र्युमेंट डॉ. बाबासाहेबांच्या वकिली कौशल्यामुळे आणि मुंबई व इथल्या मराठी माणसावरील प्रेमामुळे लुळं पडलं. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या वकिली कौशल्याने लढून गुजराती-मारवाडी व्यापाऱ्यांच्या घशातून मुंबई महाराष्ट्रात आणली, हे आज विस्मृतीत गेलंय. त्यांच्या त्या मुंबईसाठीच्या ऑग्र्युमेंटचं पुस्तक मराठीत भाषांतरित केलंय ते वि. तु. जाधव यांनी. डॉ. बाबासाहेबांच्या पुत्रानेच ते बाबासाहेबांच्या हयातीत प्रसिद्ध केलंय.
तर तार्किकदृष्टय़ा, भावनिकदृष्टय़ा व राजकीयदृष्टय़ा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचंच नाव अजित गुलाबचंदच्या त्या वांद्रे-वरळी सेतूला एकमेव पर्याय होता. पण आपला मर्द-मराठा नेता थिल्लर गळपटपणा करून राजीव गांधींचं नाव त्या सेतूला का देता झाला? कोण हे राजीव गांधी? मुंबई-महाराष्ट्र व मराठी माणसासाठी त्यांनी काय केलं?
१९८५ साली राजीव गांधी राक्षसी बहुमताने सत्तेत आल्यावर याच पवारसाहेबांचा जीव विरोधी पक्षांच्या सत्तेत रमेना. ते सरळ दहाहजारी मनसबदार म्हणून राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले आणि मुख्यमंत्री बनले! वास्तविक समाजवादी काँग्रेस कायम राहिली असती तर कालांतराने का होईना पवार राज्याचे स्वबळावर स्पष्ट बहुमत आणून नेते झाले असते. शिवाय मधल्या संक्रमणावस्थेत ते देशाचे पंतप्रधानही झाले असते. त्यांचा बुद्धिवाद, चतुरस्रता, मेहनत घेण्याची तयारी, डावपेचात्मक हुशारी (मुत्सद्दीपणा नव्हे) ही सारी त्यांच्या लाचारीच्या व असंयमी व औद्धत्यपूर्ण वर्तनाने पूर्णत: फुकट गेली. ते जर राजीव गांधींच्या फक्त साडेचार वर्षांच्या सुनामीसमोर टिकते तर त्यांची आणि प्रत्येक मराठी माणसाची त्यांनी पंतप्रधान व्हावं ही इच्छा फलद्रूप झाली असती. पवारसाहेब हे काय केलंत तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांचं?
पण ही त्यांची पहिली वेळ नव्हे, असं करण्याची. शंकरराव चव्हाणांचा त्यांनी असाच बळी दिला होता. आजवर आपण त्या वेळचे काँग्रेसचे हुकूमशहा इंदिरापुत्र संजय गांधी यांना महाराष्ट्रात बोलावून त्यांचे जोडे उचलतो, असा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना मराठा अस्मितेचे मारेकरी म्हणून लाख शिव्या घातल्या असतील. अलिकडेच राज ठाकरेंसारख्या लोकप्रिय व सद्गुणी नेत्यानेही याचा विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वडिलांच्या संदर्भात हाच लाचारीचा उल्लेख केला, पण वास्तवात महाराष्ट्राला, मराठी लोकांना पवारांविषयी सूक्ष्म अभ्यासाची किती गरज आहे हे मला तेव्हा जाणवलं. मुळात शंकरराव चव्हाणांना संजय गांधी यांच्याविषयी फार ममत्व नव्हतंच; परंतु देशाचं राजकारण आपल्या अमानवी अशा हुकूमशाही वृत्तीने गदागदा लावून सोडणाऱ्या संजय गांधी यांच्या मर्जीतून उतरल्यामुळे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री (तत्कालीन) सिद्धार्थ शंकर रे यांचे जे मातेरे होत होते, त्याची भीती शंकरराव चव्हाणांच्या मनात भरवण्यात आणि त्या भीतीतून त्यांना संजय गांधींना महाराष्ट्रात आमंत्रण देण्यास भाग पाडण्यात शरद पवारांनीच पुढाकार घेतलेला होता. अप्रत्यक्षपणे शंकररावांना संजय गांधींचे जोडे उचलायला शरद पवारांनीच भाग पाडले. जगन फडणीसांची (सत्तेचे मोहरे- ग्रंथाली प्रकाशन- व शरद पवार धोरणे व परिणाम- मेहता पब्लिशिंग हाऊस.) ही दोन पुस्तके आता बाजारातून अनाकलनीय रीतीने गायब आहेत. (माझ्याकडे ती आहेत.) त्या पुस्तकात गांधी परिवाराचे तो परिवार सबळ झाल्यावर जोडे उचलण्याची किंवा जोडे उचलण्यास प्रवृत्त करण्याची शरद पवारांची खरी कहाणी समोर येते. बिच्चारे चव्हाण पितापुत्र सत्तेशी आपला सेतू बांधून घेण्याकरता शरद पवारांनी त्यांना गांधी घराण्याचे जोडे उचलायला लावले.
व्यक्तिश: मी शरद पवारांच्या अनेक गुणांचा चाहता आहे. ज्या पद्धतीने ते एखाद्याचा ‘जगमोहन दालमिया’ करतात तो गुण मला फार आवडतो. एका पवारांसारख्या मराठी नेत्याने पूर्ण गांधी घराण्याचा ‘जगमोहन दालमिया’ केला असता तर मला ते अभिमानास्पद वाटलं असतं. पण राजकारणाच्या महाभारताच्या या अखेरच्या पर्वातही त्यांनी (प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने) दिल्लीचे जोडे महाराष्ट्राच्या देवघरात ठेवले हे किती शोकान्त आहे.
वस्तुत: पवारसाहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणाचे सूक्ष्म ताणेबाणे माहीत आहेत. त्यांच्या पुतण्याला मा. अजितदादा पवारांना ज्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या जिमिनींची सूक्ष्म जाण आहे (!) व त्यावर ते नामी-बेनामी अहोरात्र काम करत आहेत. (ज्यावर नंतर मी सविस्तर लिहिणारच आहे.) त्या प्रकारचं कौशल्य -पण सकारात्मक पद्धतीचं- मा. शरद पवारांकडे आहे. But he missed the bus!
ज्या काँग्रेसने मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना (काजरोळकर नावाचा उमेदवार उभा करून) निवडणुकीत भयावह विरोधी प्रचार करून पाडलं, त्या काँग्रेसचं राजकारण केवळ सत्ता येते म्हणून पवारांना ते पुरोगामी वाटतं?
पवारसाहेबांचं आणि माझं एक रक्ताचं नातं आहे. ते नातं मराठीपणाचं आहे. त्यांचं काही भव्य झालं जे त्यांच्या गुणवत्तेनुसार आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं, तर मला कपर्दिक फायदा नसूनही हर्षवायू होईल. कारण आमच्यातल्या केमिस्ट्रीचा मूळ पुरुष छत्रपती शिवाजीराजे भोसले हेच आहेत. पवारसाहेब, आतापर्यंत दिल्लीसमोर कणा वाकवून काय मिळतं हे तुम्हाला कळलं नाही का? उद्या राजकारणात तुमचं पतन झालं तर हिरानंदानी, दिवाण वगैरे दुसरे पवारसाहेब शोधतील. रडेल तो फक्त भोळाभाबडा मराठी माणूसच..
कधी कधी मला वाईट वाटतं की, मी हे पवारसाहेबांना वयाने फारच लहान असल्याने सांगू शकत नाही. ते ऐकले नसतेच माझं. पण माझं मन हलकं झालं असतं. मला एकदा पवारसाहेबांना ‘अलेक्झांडर द ग्रेट’ या पृथ्वी जिंकणाऱ्या माणसाचे स्मृतिस्थळ माझ्या नजरेतून दाखवायचंय. त्यावर लिहिलंय- ‘‘Bury my body and do not build my monument. Keep my hands outside. So that world knows, who won the World had nothing in hand when he died- Alexander the great.’’
raju.parulekar@gmail.com

source: lokprabha magazine

आज शिकारिचा सातवा दिवस होता.सन्ध्याकाळी मी टोर्च,धनुश्यबाण घेउन मी जन्गलाकडे वाटचाल करु लागलो.माझे पाय परत त्या आदिवासि गावाजवळील झुडपाच्या कडेला उभ्या हरणाकडे पाहुन स्थिरावाले..त्या हरणावर मी धनुश्यबाणाने नेम धरला.पण मी जसे त्याच्या डोळ्यात पाहिले,त्या क्शणी माझ्या हातातला धनुश्यबाण निखळला.गेले सहा दिवस माझ्याबाबतित हेच घडत होत.रोज सायन्काळी मी शिकारिला बाहेर पडत होतो,रोज ते हरण त्या ठिकाणी उभ असायच,रोज हरणावर लक्श केन्द्रित करायचो व त्यच्या डोळ्यान्मधला करुण भाव माझा धनुश्यबाण निखळवायचा.

हे मझ्या बाबतित का होतय या विचाराने मी अस्वस्थ झलो होतो.म्हणुन मी त्या आदिवासि गावातल्या एका ओळखिच्या व्यक्तिस थाम्बवुन माझ्याबाबातित घडत असलेल सर्व सान्गितल व ते हरण तिथे रोज का येत आणि मी लक्श का बनवु शकत नाहि हे विचरल असता त्याने सान्गितल ते हरण रोज वाजत असलेले ढोल ऐकण्यासाठि त्या ठिकाणी त्या वेळेला येत.

त्याच्या उत्तराने माझे समाधान होउ शकले नाहि कारण वारयाच्या एखाद्या लहानशा झुळकिने उडनणारया पानाच्या आवाजाने घाबरुन जाणारे हरण रोज ढोल ऐकायला येत, त्या माणसाच उत्तर अतिशोयक्तिच वाटल.हरणासारख्या भित्र्या प्राण्याला एवढ साहस येण कस शक्य आहे? त्याच्या डोळ्यात तो करुण भाव का असतो कि ज्या मुळे माझ्या हातातिल धनुश्यबाण निखळतो?

अशा भाम्बावलेल्या स्थितित मला पाहताच तो ग्रुहस्थ म्हणाला,साहेब खर सान्गु का, हे हरिण आम्ही वाजवत असलेले ढोल पहण्यासाठिच येत.त्याच्यातिल हे साहस आणि त्याच्या डोळ्यातिल ह्या करुणेचे कारण एकच आहे………… ……..

ह्या ढोलीवरील कातडे आहे त्याच्या जीवनसाथिचे…

133511593

जपानचा ‘हीरो’ ‘फ्लाईंग फिश ऑफ फुजियामा’ १९५२ साल. हेलसिंकी ऑलिम्पिकमधून जपानचा पराभूत जलतरण संघ परतीच्या वाटेवर होता. त्यात जपानमध्ये आख्यायिका बनून राहिलेला हीरोनोशिन फुरुहाशी होता. जपानच्या रेडियोवरचा समालोचक जड रडवेल्या आवाजात श्रोत्यांना विनंती करत होता. ‘‘कृपा करून फुरुहाशीला माफ करा. त्यानं जलतरणातलं एकही पदक मिळवलं नसलं तरी त्याची अवहेलना करू नका. कारण जपानला महायुद्धातल्या पराभवानंतर पुन्हा उभारी घेण्यात फुरुहाशीच्या जलतरणातील जागतिक विक्रमांचा फार मोठा हातभार लागलेला आहे.’’ मुख्यत: युरोपात भडकलेल्या दुसऱ्या महायुद्धात जपाननं जर्मनीच्या बाजूनं उडी घेतली आणि आशिया खंडातील पूर्वेकडील देशात प्रचंड मुसंडी मारली. अमेरिकेनं त्यांच्या नाडय़ा आवळण्यासाठी जपानला अत्यावश्यक असलेल्या तेलाचा पुरवठा अडवण्याचं धोरण अवलंबल्यामुळे जपानचा अमेरिकेवर राग होताच. अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी जपाननं १९४१ साली अमेरिकेच्या पर्ल हार्बर या सैनिकी तळावर अकस्मात आणि जबरदस्त हल्ला केला. त्याची शिक्षा म्हणून १९४६ मध्ये अमेरिकेनं जपानवर महासंहारक असे अणुबॉम्ब टाकले. काही लाख जपानी मरण पावले. महायुद्ध संपलं. जपानला संपूर्ण शरणागती पत्करावी लागली. शरणागती पत्करली तरी मूळ जिद्द कायम होती. जपानी जनतेनं पुन्हा उसळी घेऊन देशाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न सुरू केले. व्यापार, उद्योग, कारखाने, शेती याबरोबरच खेळातलं प्राविण्यही आपल्याला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतं याची खात्री असल्यामुळे त्याही दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले. जलतरणाकडे विशेष लक्ष दिलं गेलं. कारण जलतरणानं आजवर जपानला तशी प्रतिष्ठा मिळवून दिलेली होती. त्यांचा म्होरक्या होता हीरोनेशिन फुरुहाशी, हा १६/१७ वर्षांचा जपानी तरुण. १९२८ मध्ये पॅसिफिक महासागराच्या काठावर असलेल्या हमामात्सु या खेडय़ात ‘हीरो’चा जन्म झाला. त्याला जन्मत:च जलतरणाचं वेड होतं असं म्हटल्यास वावगं होणार नाही. एकदा एका यंत्रात बोट सापडल्यामुळे त्याच्या मधल्या बोटाचं पुढचं पेरच तुटलं. त्यामुळे पोहताना हाताची वल्ही करून हात मारताना थोडी त्रुटी निर्माण झाली होती. पण ‘हीरोनं’ त्यावर सहजच मात केली आणि जलतरणातील विक्रमांचा धडाकाच लावला. कुठल्याही खेळामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय पदकं मिळाली तरी ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकाची प्रतिष्ठा, शान काही औरच असते. जपान्यांना१९४८ सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये आपल्या ‘हीरोला’ सादर करून त्याच्या कौशल्याची झलक दाखवण्याची फार इच्छा होती. पण युद्धपिपासू राष्ट्र म्हणून जपानला त्या ऑलिम्पिकमध्ये प्रवेशच नाकारण्यात आला. ती संधी हुकल्यामुळे स्वस्थ बसतील तर ते जपानी कसले. लंडन ऑलिम्पिकच्याच सुमाराला त्यांनी जलतरणाच्या राष्ट्रीय स्पर्धा भरवल्या. त्यात फुरुहाशीनं भाग घेतलेल्या प्रत्येक शर्यतीत विश्वविक्रम नोंदवले. त्यावर जागतिक पातळीवर अत्यंत मानहानीकारक टीका झाली. जपानी जलतरण तलाव लांबीला कमी असले पाहिजेत. त्यांची घडय़ाळंही हळू चालत असली पाहिजेत वगैरे. जपानी अस्मिता, मनोवृत्ती जरी अत्यंत चिवट आणि भरारी घेण्याची असली तरी त्याला पूरक असणारी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती. दोन वेळच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था जेमतेमच होती. त्यामुळे खेळाडूंसाठी लागणाऱ्या सकस आहाराची कमतरता असणार हे उघड आहे. निहोन विद्यापीठाच्या क्लबवर हीरो सराव करीत असे. तिथल्या खाण्यामध्ये तेल काढलेलं सोयाबीन, मका, भोपळा यांचे पदार्थ असत. क्वचित तांदळाची लापशी किंवा बेडकाचं सूप असायचं. खर्चाचा मेळ साधण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतातून रताळी पळवून आणायची आणि ती विकून पैसे जमा करायचे. असले उद्योगही त्यांना करावे लागत. त्या दरम्यान, एक अमेरिकन क्रीडा पत्रकार तिथे गेला असताना फुरुहाशीचा आहार बघून थक्क झाला आणि उद्गारला, ‘‘तुला आवश्यक आहेत त्यापेक्षा कितीतरी कमी कॅलरीज तुझ्या पोटात जातायत. इतक्या थकावटीचा सराव करणं योग्य नाही.’’ त्यावर हीरोनं दिलेलं उत्तर जपानमध्ये एखाद्या लोकगीतासारखं लाडकं झालेलं आहे. तो म्हणाला, ‘‘माणूस म्हणजे काही यंत्र नाही. त्याला भाव-भावना असतात. त्यामुळे माझा आहार नाही तर माझ्या भावना माझी ताकद वाढवतात. तसंच मी माझा पोहोण्याचा सराव एखादा मासासुद्धा करणार नाही एवढा करीन.’’ हीरो आपलं म्हणणं खरं करीत असे. त्याचे प्रशिक्षक आणि सह-जलपटू आपलं वेळापत्रक संपवून संध्याकाळी वसतिगृहात परत गेले तरी फुरुहाशीचा सराव चालूच असायचा. कधी कधी तर मध्यरात्रीसुद्धा हा ‘मासा’ पाण्यात असायचा. कुणीतरी अंदाज बांधला, की फुरुहाशीनं सरावात आणि स्पर्धात जवळजवळ ८०,००० मैल पाणी कापलं असावं. १९४८ साली ऑलिम्पिकच्याच वेळी जपानमध्ये फुरुहाशीनं केलेल्या जागतिक विक्रमांना मान्यता मिळाली नाही; पण १९४९ मध्ये जपानी जलतरण संघाला अमेरिकेत लॉस एंजलीस इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घ्यायची संधी मिळाली. जपानी संघाचं स्वागत ‘हे जॅप्स, यू यलो मंकीज, गो बॅक टू जपान’ अशा शेलक्या शब्दांनी झालं. पण स्पर्धा सुरू झाल्या आणि सगळा नूरच बदलला. त्यानं ४००, ८०० आणि १५०० मीटरच्या शर्यती जिंकताना तिन्हीचे विश्वविक्रमही मोडले. तेव्हा मात्र जगाला त्याच्या जलतरण कौशल्याची दखल घ्यावीच लागली. अमेरिकन वृत्तपत्रांनी तर त्याला ‘फ्लाइंग फिश ऑफ फुजियामा’ असा किताबही देऊन टाकला. युद्धोत्तर नामोहरम झालेल्या जपानला हीरोनं प्रतिष्ठेच्या फार वरच्या स्तरावर नेऊन पोहोचविलं होतं. १९४९ च्या वर्षांत त्याचा धडाका चालूच होता. जपानमध्येच त्याचा खरा कस सिद्ध करणारी एक शर्यत झाली. ऑस्ट्रेलियाचा मार्शल, हवाईचा फोर्ड कोनो आणि अमेरिकेचा जॉन मॅकलेन हे महारथी त्या स्पर्धेत उतरले होते आणि फुरुहाशीची मक्तेदारी मोडून काढण्याच्या इराद्यानं पेटलेले होते. ४०० मीटर फ्रीस्टाईलची शर्यत सुरू झाली. मार्शल २५० मीटपर्यंत आघाडीवर होता. तोच शर्यत जिंकणार असं वाटू लागलं. पण प्रेक्षकांचा फुरुहाशीला पाठिंबा देणारा ओरडा पराकोटीला पोहोचला आणि फुरुहाशीमध्ये जणू वीज संचारली. त्यानं झपाझप हात मारत जबरदस्त वेग घेतला आणि चक्क ९ मीटर अंतराच्या फरकानं शर्यत जिंकली. जोडीला एक नवा विश्वविक्रमही प्रस्थापित केला. १९४७ ते १९५० या कालावधीत स्वत:चेच विक्रम मोडत फुरुहाशीनं एकूण ३३ विश्वविक्रम स्थापित केले. त्या विख्यात शर्यतीनंतर हीरो दक्षिण अमेरिकेत प्रशिक्षणासाठी गेला असताना त्याला पोटाच्या विकारानं चांगलंच पछाडलं. त्याचा परिणाम त्याच्या जलतरणावर फार वाईट पद्धतीनं झाला. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये जपानच्या जलतरण संघात तो होता. पण एकाही पदकाचा मान त्याला मिळाला नाही. संघ परतताना रेडिओ समालोचकानं आवाहन केल्याप्रमाणे हजारो चाहत्यांनी विमानतळावर गर्दी केली आणि हीरोनेशिन फुरुहाशी या आपल्या लाडक्या खेळाडूचं ‘आम्हाला तुझा अभिमान वाटतो’ या शब्दांत वीरोचित स्वागत केलं. १९५२ नंतर फुरुहाशीचं स्पर्धात्मक जलतरण संपलं तरी जपान आणि जागतिक पातळीवर प्रशिक्षण देण्यापासून संघटना कार्याशी त्याचा संबंध जोडला गेला तो आजतागायत, म्हणजे २ ऑगस्ट २००९ पर्यंत. गेल्याच वर्षी आपल्या ‘भारत रत्न’च्या तोडीचा ‘बुंका कोरोशु’ हा किताब जपानच्या सम्राटानं फुरुहाशीला बहाल केला. २०१६ सालच्या ऑलिम्पिकचं यजमानपद जपानला मिळावं म्हणून तो वयाच्या ८० व्या वर्षीही अहोरात्र झटत होता. आता रोममध्ये पार पडलेल्या जागतिक जलतरण स्पर्धेच्या वेळी ‘फीना’ (फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल अ‍ॅक्व्ॉटिक्स) या संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून हजर होता. पण त्या दरम्यान, २ ऑगस्ट रोजी तो आपल्या खोलीतच मरण पावलेला आढळला. त्याच्या मरण्याचं कारण जरी कळलं नाही तरी या ‘फ्लाइंग फिश ऑफ फुजियामा’चं जगण्याचं कारण मात्र एकच होतं. जलतरण आणि फक्त जलतरण.

Courtesy: http://www.loksatta.com

पुस्तके
पुस्तके वाकून पाहतात
बंद आलमारीच्या काचांआडून
पाहतात मोठय़ा आशेने
आजकाल महिना महिना भेट होत नाही त्यांची
ज्या सायंकालीन वेळा
खात्रीने यांच्या सोबतीत व्यतीत व्हायच्या
त्या आता कॉम्प्युटरच्या पडद्यावरून
सरकून जातात
पुस्तके असतात बेचैन
पाहतात मोठय़ा आशेने
आता तर त्यांना झोपेत चालण्याचीही
सवय झाली आहे
ज्या मूल्यांचा पुस्तके उच्चार करीत होती,
ज्यांची ऊर्जा कधीच संपणार नव्हती
ती मूल्ये आता अदृश्य झालीत घरातून
ज्या नात्यांच्या कहाण्या पुस्तके सांगत होती
ती नातीही विस्कटून गेली आहेत
एखादे पान उलटले तर आता हुंदका ऐकू येतो
शब्दांचे अर्थ पडले आहेत गळून
शब्द बनले आहेत
पर्णहीन सुकलेल्या फांद्यांप्रमाणे
त्यांच्यावर आता कधीच अर्थ उगवणार नाही
अनेक परंपरा मातीच्या भांडय़ांसारख्या
विखरून पडल्या आहेत
ज्यांना काचेच्या ग्लासांनी
निरुपयोगी ठरविले आहे
प्रत्येक पान उलटताना
ओठावर एक नवी चव येत होती
आता बोटांनी क्लिक केल्यावर
एकामागोमाग एक प्रतिमाच फक्त
उलगडत जातात पडद्यावर
पुस्तकांशी जे रक्ताचं नातं आहे
ते तुटलं आहे
कधी पुस्तके छातीवर ठेवून आपण निजत होतो
कधी त्यांना कडेवर घेत होतो
कधी त्यांना गुडघ्यावर ठेवून
प्रार्थना केल्याप्रमाणे वाचत होतो
हवे ते सारे ज्ञान तर पुढेही मिळत जाईल
पण पुस्तकात कधी कधी सापडत होती
सुकलेली फुले
सुवासिक पाने
आणि पुस्तके मागताना, हातून पडताना,
उचलताना
जी नाती जुळत होती, त्यांचे काय?
ती आता कदाचित कधीच जुळणार नाहीत.

देवदूत
या दूरच्या प्रवासात जेव्हा खांदे ओझ्याने वाकतात
धापा टाकू लागतो मी हा चढ चढताना
श्वास हृदयात एक गुच्छ बनून गोळा होतात
आणि वाटते- इथेच सारे संपून जाईल
एक लहानशी कविता माझी
माझ्यासमोर येऊन
माझा हात धरून म्हणते-
‘इकडे आण, माझ्या खांद्यावर ठेवून दे
तुझे ओझे मी उचलीन.’

एक पूर्ण दिवस
एक पूर्ण दिवस मला खर्चण्यासाठी मिळतो
दररोज
पण कुणीतरी हिसकावूनही घेतो त्याला लगेच
कधी खिशातून पडतो तर
पडण्याचा आवाजही होत नाही
खऱ्या दिवसालाही खोटा समजून मी विसरून जातो
गळा पकडून मागणारेही भेटतात
‘मागील पिढय़ांचे कर्ज आहे तुझ्यावर
तुलाच ते फेडायचे आहे-’
जबरदस्तीने गहाण ठेवून घेत कुणी म्हणतो,
‘हे दोन-चार क्षण खर्चण्यासाठी राहू दे
उरलेला दिवस
आयुष्याच्या खातेवहीत लिहून ठेवू
जमेल तेव्हा करू हिशेब.’
फार इच्छा आहे की पूर्ण एक दिवस
माझ्यासाठी कधीतरी उरावा
आणि तो खर्च करावा फक्त तुझ्यासोबत

शिकार
सकाळपासून आता संध्याकाळपर्यंत
ते हरीण मला हुलकावण्या देत
त्रस्त करीत
साऱ्या जंगलात धावते आहे
माझे अनेक बाण
त्याच्या मानेजवळून गेले आहेत
तेही आता माझ्याइतकेच सावध आहे
पाहता पाहता ते झाडांत अदृश्य होते
मी जवळ जातो, तर ते कधी टेकडीवर
कधी झऱ्यापलीकडे दिसते
ते माझ्यावर नजर ठेवून आहे
मी त्याला नजरेआड होऊ देत नाही
कोण कुणाला पळवीत आहे
कोण कुणाचा शिकारी आहे
समजतच नाही
सकाळी आलो होतो मी या जंगलात
तेव्हा मनात होतं
भाल्याच्या टोकावर, ध्वजासारखे
हरणाला फडकवीत
मी शहरात परत येईन
दिवस मावळू लागला आहे
मनात एक भय दाटले आहे
हे हरीणच मला शिंगावर घेऊन
जंगलात जाणार नाही ना..

इंधन
लहानपणी आई
शेणाच्या गोवऱ्या थापत असायची
तेव्हा आम्ही
त्या गोवऱ्यांवर चेहरे काढायचो
डोळे, नाक, कान
तयार करायचो
एक पगडीवाला, एक टोपीवाला
हा माझा, हा तुझा
आपली आपली ओळखीची नावे त्यांना द्यायचो.
रोज सकाळी सूर्य येऊन
त्या गोळ्यांवर खेळत असे
रात्री अंगणात जेव्हा चूल पेटायची
तेव्हा आम्ही तिच्याभोवती
बसायचो, पाहायचो
आज कुणाची पाळी आली
कुणाचा चेहरा राख बनला..
पंडित?
की मुन्ना?
की दशरथ?
अनेक वर्षांनंतर
स्मशानात बसून मी विचार करतो आहे
आजच्या रात्री
काळाच्या पेटत्या चुलाणात भस्म झाली
आणखी एका मित्राची गोवरी

त्रिवेणी
ही रस्सीखेच एकतर्फी आहे आयुष्यातली
दोरीची एक बाजू तरी माझ्या हातात हवी होती.
प्रतिस्पर्धी बलवान आहेच, समोरही येत नाही.
एक तंबू लागला आहे सर्कसचा
झोपाळ्यावर झुलत राहतात कलाकार
मन कधी रिकामं नसतंच

Courtesy: http://www.loksatta.com

मी : निळू फुले

व्यावसायिक सिनेमा-नाटकांमधून स्थिरावलेला, चांगलं नाव कमावलेला एक नट म्हणून आज मी तुमच्यापुढं आहे. दोन-अडीचशे चित्रपटांमधून मी कामं केली आहेत. मराठीमध्ये केली तशीच हिंदीतही केली. कथा अकलेच्या कांद्याची, सूर्यास्त अशांसारख्या काही नाटकांचे प्रयोग अजूनही जोरात चालू आहेत. ‘निळू फुले’ या नावाला, व्यक्तिमत्वाला, सामान्यातल्या सामान्य मराठी माणसाच्या मनात कुठंतरी जागा आहे.

 दुसर्‍या बाजूला समाजवादी चळवळीतला, सेवादलातील एक सक्रीय कार्यकर्ता, चळवळीचा एक हितचिंतक म्हणूनही माझा प्रवास सिनेमाबरोबरच घडला आहे. समाजातल्या उपेक्षित घटकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी चाललेल्या या धडपडीत मीही माझ्या कुवतीनुसार आणि पद्धतीनुसार सहभागी झालो.
या दोन्ही क्षेत्रांतील प्रवासाबद्दल आज ‘मागे वळून पाहताना’ काय वाटतं? लहानपणात, तरूणपणात ह्या प्रवासाची बीजं कुठंकुठं होती हे ताडून पाहण्याचा माझा मीच केलेला हा प्रयत्न.

लहानपणातला माझा बराचसा काळ मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या बॉर्डरवर गेला. त्याचं कारण असं होतं की, आम्ही सर्व भावंडे आमच्या काकांकडे रहात असू. आर्थिक भार कमी व्हावा हे महत्वाचं कारण त्यामागे होतं. ते दिल्लीला नोकरीला होते, त्यांच्या बदल्या निरनिराळ्या ठिकाणी व्हायच्या. त्यांचा परिसर हा शक्यतो मध्यप्रदेश असाच राहिलेला आहे. त्यामुळे शाळेची पहिली दोन-तीन वर्षं मी इकडच्या शाळेतच काढली.

काकांना एकच मुलगा होता, पहिल्या पत्नीचा. ही पहिली जी पत्नी होती ती ज्योतीराव फुल्यांच्या अगदी जवळच्या नात्यातील होती. वाघोलीची. त्यांचं आडनाव वाघोले. ज्योतिबा फुल्यांच्या समुहात वाघोले येतात. सातबा वाघोले यांचा जो मुलगा, महादू वाघोले त्यांची ही मुलगी. ज्योतिबा फुल्यांच्या अगदी जवळची. चळवळीमध्ये तिच्या वडिलांनी खूप मदत केली असा उल्लेख आहे.

ही एक चळवळीसाठीची पार्श्वभूमी माझ्यापाशी आहे. घरामधलं वातावरण सांगायचं तर चुलते नास्तिकच होते. वडील आणि बाकीची मंडळी सगळी अतिशय आस्तिक होती. घरामध्ये वातावरण धार्मिक असायचं. काकांच्या वडिलांची जी आत्या होती ती विधवा होती. तिने आमचा सांभाळ केला. वडिलांचा व चुलत्यांचाही. सगळ्यांनी शिक्षण घ्यावं असा तिचा आग्रह होता. कारण तिला त्या चळवळींची जाणीव होती. शिक्षणाच्या बाबतीत, कुठल्याही पोराला तिनं कधी खुलं सोडलं नाही. माझी चार-पाच वर्षं चुलत्यांकडे गेली. अगदी जग समजायला लागल्यानंतरची. चुलते अतिशय रसिक, नाट्यसंगीत, त्यावेळचं संगीत म्हणजे अनिलांच्या कविता किंवा कांतांच्या किंवा जोशी म्हणून गायक होते या सगळ्यांच्या ज्या रेकॉर्डस् होत्या त्या सगळ्या चुलत्यांकडे होत्या.

त्यावेळी आमच्याकडे एच.एम.व्हीचा टि.व्ही साईजचा एक ग्रामोफोन होता. त्यावेळचा अतिशय महागडा समजला जात असे. अन् स्टेशनवरचे सगळे लोक फोनो लावला की बाहेर व्हरांड्यात ऐकायला यायचे.

पहिला सिनेमाही तिथंच पाहिला.त्यावेळी मी जालम नावाच्या स्टेशनला होतो. तिथून आम्हांला जालमहून खामगांवला जावं लागायचं बाजाराकरता. तर रोज सकाळी ट्रेनने जायचो खामगांवला. ती संध्याकाळी यायची, मग आम्ही फर्स्ट क्लासमधून त्यावेळी खामगांवला अगदी ऐशमध्ये जायचो. पडदा मध्ये लावलेला. पाठीमागच्या बाजूला स्त्रिया बसलेल्या नि समोर पुरुष बसलेले. मध्ये पडदा आणि दोन्ही बाजूला ते दिसायचं अशा रितीने पहिल्यांदा मैदानातला सिनेमा आम्ही पाहिला. तेव्हा मात्र पुढे आपण या क्षेत्रात काही करणार आहोत असं बिलकुलच डोक्यात नव्हतं.

खाण्यापिण्याची अतिशय चंगळ तिकडं. मध्यप्रदेशातले लोक खाण्यामध्ये भयंकर पटाईत. त्यांच्या घरामध्ये गेलं की पहिल्यांदा मिठाई नि शेव असा सगळा जामानिमा. तिथला रिवाजच आहे तो. चहा वगैरे भानगड नाही. घट्ट सायीचं दूध मोठ्या पेल्यात दिलेलं असायचं. बासुंदी सारखं असायचं ते.

फूटबॉल, हॉकी हे तिथले खेळ. क्रिकेट त्यावेळी फारसं नव्हतं. क्रिकेट तसं मी पुण्यात आल्यावर खेळायला लागलो. मला तिथं हॉकी, फूटबॉलचं भयंकर वेड होतं.

शाळेत शिक्षण मराठी अधिक हिंदी असं दोन्हींतून असायचं. त्याची गंमत आहे विशेष. त्या भागातला महाराष्ट्रीय माणूस घरी फक्त मराठी भाषा बोलायचा. बाहेर आला की हिंदीच बोलायचं. अजूनही तीच पद्धत आहे. नागपूर त्यावेळची राजधानी होती मध्यप्रेदशची. आणि आजही नागपूरमध्ये हिंदीचा प्रभाव जास्त आहे मराठीपेक्षा. तिथं मला वाटतं मी तिसरी-चौथीपर्यंत शिकलो. त्यानंतर पुण्यात मी साधारण ४५ च्या पुढे आलो. पुण्याची ओढ एकीकडे होतीच. पुण्यात आल्यावर इथे शिवाजी मराठा शाळेत प्रवेश घेतला.

पुण्यात मला शाळेत जावंसं वाटायचं नाही फारसं, पण एकच होतं की मराठी या विषयाविषयी खूप ओढ होती. सर्जेराव जगताप हेडमास्तर होते. बाबूरावांचा संबंध त्या काळामध्ये आला. बाबूराव अतिशय उत्तम इंग्लिश शिकवायचे. विशेषतः इंग्रजी उच्चार कसे करावेत. आपण नेहमी ‘हॉटेल’ म्हणतो ना, ते कधीही आम्हांला ‘हॉटेल’ म्हणू द्यायचे नाहीत. ‘ऑटेल’ म्हणायचे. उच्चारांबाबत त्यांचा फार आग्रह असायचा.

मराठीचा तास भयंकर आवडायचा. मराठीला खांडेकर म्हणून आमचे एक शिक्षक होते. आता त्यांचं वय माझ्या अंदाजे ८७/८८ असेल. परंतु उत्तम संस्कृतचे आणि मराठीचे शिक्षक. कवितांमध्ये ग.ह. पाटलांच्या ज्या कविता होत्या त्यांनी आम्ही खूप झपाटलो होतो. पण परीक्षेत मात्र कसंबसं पास होत जायचं. म्हणजे वरच्या वर्गात गेला एवढंच समाधान. घरामध्येही तशी जबरदस्ती नाही केली कुणी. पास होतोय, शिकतोय एवढंच खूप आहे असं असायचं आणि शिवाय कुणाचंच आमच्या अभ्यासाकडे लक्ष नसायचं.

आमची ‘शिवाजी मराठा’ म्हणजे त्यावेळचं चळवळीचं केंद्र होतं.बहुजन समाजाच्या लोकांना शिक्षण दिलं पाहिजे आणि बहुजन समाजाच्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे अशा स्वरुपाचा आग्रह धरणारी ती शाळा होती. तरी तिथे शिक्षक बरेचसे ब्राम्हणही होते. आश्चर्याची गोष्ट ही की बाबूराव जगतापांनी बहुजन समाजासाठी शाळा काढली तरी असा दु:स्वास कधी केला नाही की शिक्षक मराठा पाहिजे किंवा माळी पाहिजे किंवा अमुक पाहिजे. पुण्यामधल्या चांगल्या शिक्षकांचा जो गट होता तो त्यांनी उचलून आणला होता. शाळेत खूप शिस्त होती आणि शिक्षक जी ‘ढ’ मंडळी होती त्यांच्याकरता शाळा सुटल्यानंतर स्पेशल वर्ग घ्यायची. बस! त्रासच व्हायचा खरं म्हणजे. इतर मुलं क्रिडांगणावर खेळत असायची आणि आम्हांला मात्र टांगून ठेवलेलं. ज्या विषयात आम्ही ढ आहोत त्याची उजळणी व्हायची आणि हे अगदी डिव्होटेडली व्हायचं कारण तोपर्यंत शिकवण्या वगैरे भानगड नव्हती. उलट शाळा सुटल्यानंतरचे वर्ग हीच शिकवणी आणि त्याच्याकरता पैसे नाही द्यावे लागायचे. दप्तराचं मात्र फारसं ओझं नसायचं. अजूनही आठवतं की फार तर दोन-तीन वह्या आणि दोन-तीन पुस्तकं यांच्याशिवाय काही नसायचं. साधारण ३-४थी ला पाटी सुटली. त्यानंतर सगळ्या विषयांकरता म्हणून एक वही. मोडी वगैरे गिरवली नाही. पण कित्ता गिरवला. त्या काळी व्ह. फा. ची परिक्षा होती. ती एक फार प्रेस्टीजचा प्रश्न मानली जायची. साधारण खेड्यातून आलेली मुलं व्ह. फा. होऊन लगेच शिक्षक होऊन जायची. त्यांना स्कॉलरशिप असायची.

फ्रीशिप आम्हांला नसायची. पण गरीब विद्यार्थ्यांसाठी होती. त्यांच्यासाठी वसतिगृह होतं शाळेचं. त्यांना सयाजीराव गायकवाड, शिवाजी मराठ्याला जे होते ते मदत करायचे. इतरही महत्वाचे लोक म्हणजे राजाराम महाराज, कोल्हापूरचे. त्यानंतर सयाजीराव गायकवाड, भालजी पवार या सर्व मंडळींचा खूप पाठिंबा होता. बहुजनसमाजाची शाळा आहे, त्यामुळे ही सर्व राजेमंडळी सहसा मदत करायची. शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये ‘पंचहौद मिशनची’ सगळी ख्रिश्चन मुलं यायची. त्यावेळी सत्यशोधक समाजाच्या चळवळीचा परिणाम म्हणा, पण त्यावेळी ही सर्व ख्रिश्चन मंडळी आणि बहुमत समाजातील लोक यांचं एक नातं असायचं. पंचहौद मिशनचा प्रत्येक पोरगा हा शिवाजी मराठ्यात यायचा आणि त्यांचं एक आपुलकीचं नातं असायचं.

आमची ही शाळा शुक्रवार पेठेत. येणारे सर्व लोक हे प्रामुख्यानं बहुजन समाजातील लोक होते. त्यामुळे पुण्यातील सदाशिव, नारायण ह्या ब्राह्मण वस्तीपासून सर्वार्थानं लांब.

एकतर नारायण, सदाशिव पेठ यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत आणि आपल्याला तसं झालं पाहिजे, तसं बनलं पाहिजे, या स्वरूपाची शिकवण असायची. आपण मागे का राहिलो त्याचं कारण हे की, आपण शिक्षणामध्ये पाठीमागे आहोत आणि या समाजाइतकी जर तुम्हांला प्रगती करायची असेल तर तुम्हांला शिकलं पाहिजे, असं असायचं आणि विशेष म्हणजे हे जे सगळे ब्राह्मण शिक्षक होते, ते ब्राह्मण असले तरी त्यांनी असा भेदभाव केला नाही, जो नू. म. वि. मध्ये चालायचा.

ह्याउलट आमची शाळा ही चळवळीचं केंद्र होती. पारतंत्र्याबद्दल, त्याच्याविरुद्ध केल्या जाणार्‍या चळवळीबद्दल आम्हांला वर्गातच सांगितलं जाई. आमच्याकडे पवार नावाचे एक इतिहासाचे सर होते. मला वाटतं की इतिहास अशा पद्धतीनं शिकवला जाऊ शकतो, एक नवी दृष्टी देणारा तो असू शकतो हे पवारांकडून आम्ही शिकलो.

‘इतिहासाला नवी दृष्टी देणारा माणूस’ असे हे सर होते. आम्हांला समजून घेण्याची क्षमता फार नसल्यामुळे त्यांचं बरेचसं वाया जायचं पण काही महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या.

कुठल्याही समाजामध्ये एखादा विशिष्टच एक समाजाचा घटक हा सबंध समाजावर आपलं एक वर्चस्व ठेवतो आणि तेही मग कसं धार्मिक पध्दतीनं करतो हेही सांगायचे. तर अशा पध्दतीनं इतिहास शिकवायचे. आता २०/२५ वर्षं झाली. आता ते माझ्या लक्षात येतं की, या माणसाने त्याकाळी खूप निराळी दृष्टी दिली. अर्थात आमच्यात कळायची क्षमता नव्हती एव्हढे मात्र खरे.

शाळेमध्ये इतर चळवळी खूप होत्या. सेवादलाची चळवळ ‘शिवाजी मराठा’ पासून सुरू झाली. पहिल्यांदा अप्पा मायदेव आणि लालजी कुलकर्णी यांनी अवस्थी वाड्यापासून, म्हणजे शिवाजी मराठाच्या पाठीमागची वस्ती आहे तिथून सुरू केली. गोपाळ अवस्थी चळवळीत होता. त्याच्या मांडीला एक गोळी लागली होती. एस्. पी. कॉलेजवर जो गोळीबार झाला होता त्यात. धारिया त्यावेळी विद्यार्थी संघटनेचे चिटणीस होते. आणि त्या काळात आनंदराव पाटील, मोहन धारिया, गोपाळ अवस्थी, भाई वैद्य, बाबा आढाव हे त्या चळवळीत सामील होते. सेवादलाची ती शाखा त्या भागामध्ये पहिली. विशेष म्हणजे शाळेतून त्याला विरोध नाही झाला. उलट शाळा सुटली रे सुटली की आम्ही तिकडं जायचो. कारण मला असं वाटतं की संघाच्या अगदी निराळं तत्त्वज्ञान मानणारी ही संघटना आहे, याचं भान शाळा प्रमुखांना होते. तेव्हा सेवादलाला विरोध नव्हता. सेवादलाशी बाबुराव जगतापांचं नातं फार चांगलं होतं. इतर बुरसटलेल्या विचारांपेक्षा आपण वेगळ्या प्रकारे जातो आहोत किंवा गेलं पाहिजे, ही जाणीव त्यावेळी कुठंतरी होती. कारण ही जाणीव त्या शाळेत होती. मुस्लिमांविषयी आज जे वातावरण आहे तसं शाळेत नव्हतं. त्यावेळी खरं आश्चर्य वाटायचं की, इथं जास्तीत जास्त मुस्लिम विद्यार्थी शिवाजी मराठ्यात होते, जास्तीत जास्त ख्रिश्चन विद्यार्थी होते. जास्तीत जास्त दलितांना फ्रीशिप्स् असायच्या.

सेवादलात संघाइतकी कडक शिस्त नव्हती. सगळा मुख्य भार असायचा तो बौद्धिक कामावर. दर शनिवार रविवार बौध्दिकाचा तास असायचा. शिबिरांमध्ये खेळाचा भाग थोडा असायचा. दुपारचा, विश्रांतीनंतरचा काळ सगळा बौध्दीकाचा. संध्याकाळी बौद्धिक असायचं. बौद्धिकामध्ये ब्रिटिश, एकंदर हिंदुस्तानची आजची परिस्थिती यावर भर असायचा. हिंदु-मुस्लिम संबंधावरही भर असायचा.

पुढे सेवादलाशी जवळीक आणखी वाढली. कलापथकातून काम करायला लागलो. सेवादलाची खड्डा पटांगणाची जी शाखा झाली त्यावेळी कलापथक चालू झालं होतं. कुठलीतरी एकांकिका होती, सावकार आणि त्याचा वेठबिगार अशी त्याची गोष्ट होती. त्यात मी काम केलं. मी कधीच रंगमंचावर घाबरलो नाही. मी पहिल्यापसून बाजी मारत आलो. त्यावेळी माझंच काम लोकांना आवडलं. त्यावेळी पोरांची निवड करण्याकरता अंबिके, डॉ. देशपांडे होते. तेव्हा त्यांनी माझीच निवड केली. ग्रामीण जो बाज आहे तो तुझ्याशिवाय कुणाला जमणार नाही असे ते म्हणाले.

कलापथकात सर्वात जास्त रस घेणारा कोण? तर निळूच. त्यामुळे माझ्याकडे कलापथकाचं प्रमुखपद आलं. आणि मला मनापासून रसही होता त्या कामात. मला वाटायचं काम करावं. आणि त्या निमित्तानं वाचनही करायचो. नाटकांचं वाचन व्हायचं, मराठी साहित्याशी जवळचा संबंध यायचा. तो शांताबाई नावाच्या माझ्या शिक्षिकांचा प्रभाव होता. शांताबाई मराठी शिकवताना दरवेळी काही ना काही मराठी साहित्याबद्दल सांगायच्या, कथा सांगायच्या. मोपासाँ नावाचा कुणीतरी आहे, मॅक्झिम गॉर्की म्हणून कुणी आहे हे सगळं. शांताबाई त्या काळामध्ये फ्रेंच,जर्मन रशियन सहित्यातल्या गोष्टींचा अनुवाद सांगायच्या. त्याचं मला वेड लागलं. इतर कुणापेक्षा मी तिथे जरा शहाणा माणूस ठरलो असेन. कारण माझं वाचन जरा जास्त होतं.

पण शहाणं होण्यासाठी कॉलेज करावं, डिग्री घ्यावी असं कधीच वाटलं नाही. का कुणास ठाऊक, शिक्षणाविषयी पहिल्यापासून रसच नव्हता. आणि ही गोष्ट खरी होती की मी आयुष्यभर नोकरी करीन ही कल्पना कधी माझ्या डोक्यात नव्हती. मी ज्या काही नोकर्‍या केल्या असतील, त्या अतिशय नाईलाजानं केल्या. माळी कामाची नोकरी केली ती फोर्स केलेलाच होता म्हणून. ती मला आपोआप मिळून गेली. माझं आवडीचं काम होतं माळीकाम आणि मी हेडमाळीच होतो त्यामुळे कामं वाटून घेतली की, मी मोकळा व्हायचो पुस्तकं वाचायला. पुस्तकही वाचून व्हायचं आणि आवडीचं काम असल्यानं तेही व्हायचं. बाकी मी नोकरी करीन असं कधीच वाटलं नाही. का कुणास ठाऊक, तिरस्कार होता मला, की नाही मी नोकरी नाही करणार.

घरची परिस्थिती तर अतिशय सामान्य होती. आमचं दुकान होतं मंडईच्या आत भाजी पाल्याचे दोन गाळे होते. पण ते चालवायला कोणी नाही म्हणून आम्ही ते कराराने दिले होते. त्याचंही भाडं यायचं. ते दिवस फार कठीण. फार वाईट दिवस होते. तरीही येणार्‍याजाणार्‍याला चहा देण्याची आमच्या घरी पद्धत होती. भावाचा स्वातंत्र्य चळवळीतला संबंध आणि सगळी येणारी जाणारी अनेक माणसं. कुणी आले की त्याला चहा देणं हे घरामध्ये ठरलेलं असायचं. त्यामुळे चहा ठेवतानाच एक बुधलं भरूनच ठेऊन द्यायचा. तो आणखी वाढायचाच. एकेक एकेक असा. अप्पा मायदेव, लालजी कुलकर्णी, आचार्य केळकर, हमीद दलवाई ही मंडळी आमच्याकडे यायची. त्यांना चहाच. दुसरं काही देण्यासारखं नव्हतंच. कुणाला खायला द्यावं इतकी परिस्थिती नव्हती. तेव्हा सगळ्यात चांगलं म्हणजे चहा.

चैन करणं म्हणजे मटण खाणं ही कल्पना. खरं म्हणजे, आमच्याकडे नियमितपणे बुधवार आणि रविवार हे मटणाचे असायचे. कधी बुधवारी जर चुकून नसलं तरी रविवारी नक्की असायचं. घरामध्ये ज्वारी बाजरीच्या भाकरी आणि मटण असलं की चैनीचा दिवस असायचा. समजू लागल्यापासून सकाळी दहाचा एक सिनेमा मारायचो आम्ही. ही चैन.

श्रीमंत नातेवाईक होते, जे आता नातेवाईक म्हणवून घेतात, ते सगळे खूप दूर राहायला असायचे. त्यांना माहीत होतं की आम्हांला अडचण आहे. तात्या बोराटे जी जमीन करत होता ती नातू बागेतील एका ब्राह्मण माणसाची. कामासाठी एकदा तात्या नि मी गेलो तिथं. त्यांनी आम्हाला चहा दिला पण कपबशी बाहेर ठेवायला सांगितली. त्यात पाणी ओतायला सांगितलं आणि मग ते आत नेलं. मला आठवतं की, आम्ही दोघं चर्चा करत आलो की आपल्याला ते हलके समजतात. हा एक प्रसंग मला अगदी झोंबणारा आहे. मला अजूनही तो जसाच्या तसा आठवतो. त्याच्या घराबाहेरची ती पायरी, त्याच्यावर कप ठेवलेले. त्यात आम्ही पाणी ओतलं नि मग ते कप आत नेलेले सगळं आठवतं.

माझ्या स्वभावात जो मवाळपणा आहे तो पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे माझी ह्या प्रसंगावरची प्रतिक्रियाही तशीच होती. त्या काळामध्ये इंदुताई, आचार्य केळकर, हरीभाऊ लिमये, सदाशिव बागाईतकर, प्रभाकर मानकर ही सर्व मंडळी होती. ती फार निष्ठावान मंडळी होती.

त्यावेळेला ब्राह्मणप्रवृत्ती विरोधी आणि ब्राह्मणविरोधी असे दोन भाग होते. आणि त्यावेळी सगळी चळवळीतली मंडळी, सगळी ब्राह्मण होती. आणि त्यांचं आमच्याशी वागणं चांगलं असायचं म्हणजे अगदी धाकट्या भावासारखे. अप्पा मायदेव हा माणूस तर उत्तम संघटक कसा असावा याचं उदाहरण. लालजी कुलकर्णी यांचा व्यवहार अत्यंत चांगला असायचा. संघटनेमध्ये काही अडीअडचणी, कुणी आजारी आहे, कुणाला शिक्षणाला फी नाही, कुणाला कपडे नाहीत अमुक नाही, हे सगळं हे पहात असत. या दोन माणसांनी मिळून त्या काळामध्ये एवढी जवळीक साधलेली होती की, आज जो भाग संघटनेने भरलेला नाही किंवा कट्टर ब्राह्मण झालेला नाही याचं कारण ही मंडळी. यांच्यामुळे तुम्ही कडवे ब्राह्मणविरोधी नाही होऊ शकत, तुम्ही त्या प्रवृत्तत्तीविरुद्ध झगडा. हा एक विचार त्यांनी आम्हाला दिला.

त्याच काळामध्ये, ४२च्या आसपास लोहियांचं नाव ऐकायचो तरी त्यांच्याशी तसा काहीच संबंध नव्हता. उलट असं होतं की त्यांची जी मित्रमंडळी पुण्यात होती ती त्यांचा थोडा रागरागच करायची किंवा टिंगल करायची.

साने गुरुजींशी ते शिबिरात आले की प्रत्यक्ष बोलणंही व्हायचं. त्यांचा माझ्यावर खूपच प्रभाव पडला. स्वयंसेवक होतो मी त्या वेळेला. अफाट जनसमुदाय समोर बसलेला. व्यासपीठ टाकलेले. आमची गाणी झाली की गुरुजींनी बोलायचं होतं. गुरुजी खाली मान घालून कुठेतरी बसलेले, एवढी मोठी टोपी, मळलेला शर्ट अन् धोतर. मला वाटलं बेडेकर म्हणून आमच्याकडे एक गृहस्थ होते. मी म्हटलं, बेडेकर का? नंतर हेच साने गुरुजी असं कळल्यावर चला म्हटलं. ते असे खाली मान घालून वगैरे बसलेले. बोलायला उठले. ५-७ मिनिटांमध्ये त्यांची तार लागली १||-२ तास. गुरुजी त्यावेळी काहीही सांगतील ते मॉब ऐकायला तयार आहे अशी परिस्थिती होती. मला वाटतं की ते भाषण त्यावेळी बाळासाहेब खेरांनी सेवादलावर बंदी घातली त्यावेळचं असावं. गुरुजी भडकलेले होते आणि संतापाने बोलत होते. जबरदस्त प्रभाव माझ्यावर होता त्यांचा.

लोहियांनी मी फार प्रभावित झालो. सतत विचार करणार्‍या माणसाला कसं मुद्याचा काही विचार करावा लागत नाही, तो एकदा बोलायला लागला की ते सुरुच राहतं. असं २/२।। तास बोलत राहणं आणि ज्या तपशिलानं बोलणं, समांतर काही बोलणं, उदाहरणं, तीसुद्धा तपशिलांसकट देणं हे लोहियांचे विशेष. त्याला मूलभूत विचाराचे म्हणतात. कठीण आहे हे आणि तेही अतिशय सोप्या भाषेत, पण त्याला अतिशय उत्तम अलंकार देत असत. काळजाला भिडेल अशी भाषा, कोट्या. हिंदु-मुस्लिम असाही काही प्रश्न आहे आणि अशा प्रश्नांची ही एक बाजू असते, ती त्यांच्याकडून कळली. दलितांच्या राखीव जागांसंबंधी किंवा स्त्रियांच्या प्रश्नांसंबधी पार्टीतले कोणीही कधीही बोललेलं मला आठवत नाही. विचार असतील त्यांचे पण आग्रहपूर्वक मांडणी या विषयाची लोहियांनी केली. इतरांच्याकडे ती नव्हती. कदाचित असंही असेल की, नेहमी एक गोष्ट बोलली जाते की सर्वच पक्षांचे कम्युनिस्ट असोत, की सोशॅलिस्ट असोत, या सर्वांचे नेतृत्व ब्राम्हणी असल्यामुळे – ते प्रश्न तितक्या पोटतिडकीने जाणवत नसावेत.

बाकी विरोधी पक्षांपैकी डांग्यांचा प्रभाव फार मोठा होता. डांग्यांच्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळी आम्ही असायचो आणि अत्र्यांबरोबर तर मी कायमच असायचो.

अत्रे म्हणजे फड जिंकणारा माणूस. मंडईमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी बाबूराव सणस विरुद्ध एसेम जोशी होते. बाबूराव सणस यांचं भाषण मंडईत होतं. मंडई ही बाबूराव सणसांची राजधानीच. काय होईल याची चिंता. पण अख्खी मंडई भरलेली होती. आणि अत्रे इतका बिनधास्त माणूस होता की, पाठीमागून सिगरेट बिगरेट मारुन, एकटेच थोडीशी ब्रँडी घेऊन व्यासपीठाच्या मागे असलेल्या विंगेत गाणी होईपर्यंत सिगरेट ओढत बसलेले होते. उभे राहिले आणि नेहमी आपण बोलतो तसे सुरु झाले. कुठलं काय? मारामारी नाही न् काही नाही. टाळ्यांच्या कडकडाटात मला वाटतं, तिथे जमलेले काँग्रेसचे लोकसुद्धा हसून हसून बेजार झाले होते. हजारोंच्या संख्येत दाटीवाटीने त्या मंडईच्या आवारात लोक बसले होते. अक्षरश: मध्येच कुठेतरी गाय उठली म्हणून थोडीशी गडबड फक्त झाली. ‘काय चिंता करु नका. कोण हरामखोर इथे मंडईमध्ये अत्र्याला अडवू शकतो? त्याचा बाप आहे मी’, असे अत्रे म्हणाले. भयंकर हिंमत. त्यावेळी मंडईमध्ये अतिशय गुंडगिरी होती. पण अत्र्यांनी अख्खी मंडई त्यादिवशी जिंकून टाकली.

त्यानंतर गोवा चळवळीशी संबंध आला. मी सत्याग्रह नाही केला. पण महिनाभर आम्ही गोव्यातल्या सत्याग्रह्यांसाठी चपात्या जमवल्या, धान्य जमवलं. एके दिवशी सरळ उठलो नि बेळगावला गेलो. घरी कुणाला माहीत नव्हतं. आम्ही फक्त पिशवीमध्ये एक शर्ट न् पायजमा एवढे टाकलं आणि निघालो बेळगावला. मोरारजीभाईंनी एस्. टी. बंद करुन टाकलेली होती सावंतवाडीला जायची. सावंतवाडी त्यावेळची गोव्याची सरहद्द. मग तिथून ७५ मैल आहे. चालत आम्ही गेलो. दंडवते त्यावेळी त्या तुकडीचे नेते होते. हिरवे गुरुजींचं गोळी लागून निधन झालं. त्यावेळी मोजक्याच लोकांनी सत्याग्रह करावा अशी तिथे गोवा समितीच्या कार्यकारिणीची बैठक बसली होती त्यांनी ठरवलं. त्यांनी मधु दंडवते आणि भाई वैद्य या लोकांना परवानगी दिली. दहा किंवा बारा लोक असावेत. बाकीच्या सगळ्यांना सांगितलं, ‘कुणालाही परवानगी नाही, जायचं नाही’. आणि साने गुरुजींची परवानगी असल्याशिवाय तुम्ही भाग घ्यायचा नाही असं आम्हांला सांगितलं. मग आम्ही तिथं सावंतवाडीला एक दिवस राहिलो. पोलिस मारतील ही भीती होती. पण मरणाची तरी अशी भिती वाटली नाही. मला वाटतं की जोश असावा जरा त्या काळातला.

आजही त्याचा पश्चाताप होत नाही, उलट असं वाटतं बरं केलं, त्यावेळेला एवढे आपण धैर्य दाखवू शकलो. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला तसा पोलिसांचा मार खाल्ला. इंदिराबाई जेव्हा पुण्यात आल्या तेव्हा मी आणि शांती नाईक, आम्ही सगळ्यांनी त्यांच्या गाडीला डेक्कनवर अडवलं आणि रिबेरोने माझ्या पाठीवर सणसणीत छडी मारलेली आठवते. सगळे जण आम्ही रस्त्यावरच पडलो. गाडी पूर्ण ब्लॉकच केली. धडाधडा पोलिसांनी मारायला सुरुवात केली. रिबेरोने माझ्या पाठीत छडी मारली ती चांगली आठवते. रिबेरो अतिशय देखणे होते, उंच, सडसडीत. आजचे जे रिबेरो आणि त्यावेळचे रिबरो यात फार फरक आहे. पण लोक घाबरायचे. ‘रिबेरो आला रे रिबेरो मारणार आता’ सगळेजण ओरडायचे. तेवढाच मार, बाकी काही नाही.

मी : निळू फुले – अंतिम भाग

Admin-team | 21 August, 2009 – 03:04

मी : निळू फुले – पहिला भाग

याच काळात चित्रपट बघणं, विशेषत: बंगाली, इंग्रजी, आणि चित्रपटांबद्दल वाचणं याची चटक किंवा व्यसनच लागलं खरं म्हणजे. बंगाली चित्रपट आम्ही पाहिले अमीर शेखमुळे. कारण त्याच्या ऑफिसमध्ये एक बंगाली बाबू होता. तो इथे बंगाली फिल्म्स आणायचा. ती चटक तिथून लागली, अमीरमुळे. इंग्रजी सिनेमा तर आम्ही पूर्वीपासूनच पाहायचो.

तेव्हा मात्र मला सिनेमात काम करावं असं वाटत नव्हतं. मित्रमंडळींची हिराबागेत एक खोली होती. भाई वैद्य, शिवाजी जवळेकर, वसंतदादा, तात्या बोराटे, दत्त्ता माळवदकर, बोरकर, राम ताकवले, आम्ही सगळे त्या खोलीत जमायचो. त्या खोलीचं नाव होतं साधना खोली. तिथं सगळी मंडळी नोकरी किंवा घरची कामं सोडून जमा व्हायची. पत्ते खेळणं, कॅरम खेळणं. तेव्हा अशा गप्पा चालताना भाई एकदा म्हणाले, ‘तुला काय वाटतं, काय करावं?’ अगदी आवंढा आला घशाशी त्यावेळी आणि मी म्हणालो,’ मला लेखक व्हायचंय’. अगदी भरून आल्यासारखं असं मी काहीतरी बोलत होतो. मात्र ६२-६३ साली एकदा उदय विहारमध्ये, त्यावेळी बहुतेक भाई शहरप्रमुख होते, तेव्हा विषय निघाला होता. आणि भाई म्हणाले की,’निळू हा एक फार मोठा आर्टिस्ट होणार आहे’’ हे मला आजही आठवतंय. हा त्यांचा विश्वास कसा निर्माण झाला असेल?

एकतर कलापथकाची जबाबदारी मी सांभाळली होती. आणि ज्या पद्धतीने तिथे जी मुले येत होती त्या मुलांना मी, जे शिकवलं, ते ज्या पद्धतीनं शिकवलं, त्यातून माझ्याबद्दलचा विश्वास वाटला असेल. वाचन वगैरे एक वर्ग असायचा. चळवळ असल्यासारखं या लोकांना मी घेऊन जायचो.

आपण पाहिले ते आपल्या मित्रांनी, सहकार्‍यांनी बघावं, असं एक वाटायचं. अगदी पुस्तकांच्या बाबतसुद्धा मी थोडा सल्लागार झालो होतो. म्हणजे असं सांगायचं की , मर्ढेकरांच्या कविता कुठल्या, अमुक कुठलं चांगलं पुस्तक आहे, हे मला तेव्हा कळायला लागलं होतं.

खरंतर मी पहिल्यांदा सेवादलात फुल टाईम नोकरी वगैरेचा विचार केला. त्यानंतर मी असा विचार करत होतो की, कॅमेरा शिकावा. म्हणून माझा ‘राजकमल’ला एक बागल म्हणून मित्र होता त्याला गाठलं. चित्रपट पाहत असल्यामुळे मला जाणवलं की, कॅमेरा हा फार महत्त्वाचा घटक आहे, तेव्हा कॅमेरा शिकावा. त्यामुळे मी त्याच्याकडून ‘राजकमल’मध्ये वशिला लावत होतो. तो म्हणाला, ‘ये ना, पण म्हातारा काही जास्त पैसे देणार नाही हं!’ पण मग मुंबईत राहायचं कुठं? तेव्हा मी लिलाधर हेगडेंना एक पत्र लिहिलं. ते म्हणाले, ‘चिंता करू नको, जरुर ये. माझ्याच घरात रहा. काही बिघडत नाही. एक भाकर मिळाली तर त्यातली अर्धी तू खाशील, अर्धी मी खाईन’.

एकदा मुंबईत आल्यावर मला एकदोन बोलावणी आली होती. म्हणजे जसं मान्यांच्याकडून आलं तसं राम गबाल्यांकडून आलं. अर्थात ते अर्धवट राहिलं. नंतर काय येऊन टपकलं ते मला माहीत नाही. पण मी तिथे एकदोन दिवस काम केलं आणि त्यांनी माझं कॉन्ट्रॅक्ट काहीतरी ५०० रूपयांचं केलं. तिथून काय मग? कुठल्याही नटाच्या वाटयाला असलेलं यश. ज्या दिवशी ती एक गाव बारा भानगडी फिल्म लागली… तो किस्सा मी लिहिलाय. फार मजेशीर किस्सा आहे. तेव्हा मी कथा अकलेच्या कांद्याची मध्ये काम करत होतो. गाडीमध्ये आमची जागा म्हणजे कुठं? कंडक्टरच्या बाजूला जी मधली जागा असायची तिथे आम्ही झोपायचो. लातूरला गेलो. उठलो अगदी सकाळी तर लातूर स्टेशनवरती १५-२० हजारांचा मॉब चहूबाजूला. शिट्ट्या, पोलीस, असा दंगा चालू होता. महेश मला म्हणाला, ‘हे जाऊ दे’. कारण त्यावेळी तो प्रसिद्ध होता. विच्छा माझी पूरी करामध्ये काम केलेला. तो म्हणाला,’आपण नंतर जाऊ’. आम्ही तिथेच आपले तोंड बिंड धुतलं आणि तिथंच बसून राहिलो.
सगळे गेले. आम्ही दोघंच राहिलो. मॉब हलत नव्हता. शिट्ट्या आणि आवाज. बोंबाबोंब. तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर आला. एक पोलीस म्हणाला,’ते काय तिथे बसलेत ते’. तो म्हणाला,’ए चला उठा’. आम्हांला कळेना, आम्हांलाच का उठवतोय. दरवाजा उघडला त्यांनी, जमावापुढं उभं केलं. लोकांनी जो दंगा केला. ‘आला आला आला’! काय एखाद्याची प्रसिद्धीची हवा काय असू शकते. १५-२० हजार लोक नुसते, पोलिसांनी मोठं कडं केलेलं, त्याच्यामध्ये आम्ही सगळे बावळट. इतकी बेकार परिस्थिती होती आमची. हातात त्या वळकटया. इन्स्पेक्टर ‘हटो हटो’ करीत होता. लॉजपर्यंत अशी मिरवणूक आमची निघाली. लॉजच्या मालकाने ‘साहेबांसाठी स्पेशल दुसरी खोली’ म्हणून मला स्पेशल खोलीत ठेवलं. त्यांना ओळखू येत नव्हता कोण साहेब. आख्खं हॉटेल, लॉज माणसांनी भरलेलं नुसतं. काय चमत्कार आहे असं वाटलं.

सिनेमा या माध्यमाशी निश्चितच खूप जवळीक निर्माण झाली होती. कॅमेरा वापरणं, समजून घेणं चालू होतं. शॉट नसला की इतर लोक पत्ते खेळत बसायचे. मी मात्र कॅमेर्‍यापाशी कायम बसलेलो असायचो.

यातून माध्यम चांगलं समजतं. इतर लोक ज्या स्वरूपात लाऊड अभिनय करायचे, त्या स्वरूपात अगदी पहिल्यापासून मी कधीच फार लाऊड अभिनय केला नाही. का कुणास ठाऊक.. फिल्म्स पाहिल्यामुळे असेल कदाचित. नेमकं काय केलं पाहिजे फिल्ममध्ये ते मला फार कळायचं. कुठल्या नटाचा इम्पॅक्ट जास्त पडतो, ही जाणीव नक्कीच फिल्म्स पाहून आली असावी. फारच मोठे नट मी पाहिले. त्या काळामध्ये हॉलीवुडमध्ये अफलातून नटांचा संच होता, लॉरेन्स ऑलिव्हिए, चार्ल्स लॉटन, चार्ल्स बोएर, रोनाल्ड गोल्डमन, कॅथरिन हेपबर्न, जेम्स डिन असली अफलातून मंडळी.

अ‍ॅक्टिंग काय आहे? एखादा माणूस एखादा लुक देतो, एखादा माणूस…. आणि हे जाणवलं की कुठल्याही रोलमध्ये माणूस सहज काम करू शकतो. आता मी जे १००-२०० चित्रपटांमध्ये काम केलं, त्यात शंभर चित्रपटांमध्ये फार मन लावून नाही केलं. पण घटना घडते आहे. एखादा सीन, ती घटना जोपर्यंत तुमच्या आत इथं भिडत नाही, ती भिडली ना मग तुमचं काम म्हणजे अ‍ॅक्टिंग करायची गरजच नाही. ते तुमच्यात आपोआप येतं. अशा स्वरूपाचं मन नटाचं तयार व्हायला हवं असं मला वाटतं. शॉटच्या अगोदर मी ते समजून घ्यायचो आणि मी एकदा घेतलं समजून की मला म्हणून काही करायला लागायचं नाही. ते माझ्याकडून आपोआपच होतंय असं वाटायचं. आणि जे जे काही करायचं ते फार व्यवस्थित असायचं. अर्थात त्याचाही अभ्यास असल्यामुळे ते फार लाऊड नसायचं. एवढं केलं तरी पुरेसं आहे असं कळायचं.

मला असं वाटतं की, असं जे रोलमध्ये घुसणं ज्याला म्हणतात ना, ते शिकलो. सर्वच पिक्चर्समध्ये असं मी करत नाही.

आता सामनामधला पुढारी आहे आणि मास्तर आहे. हा संघर्ष आतवर कुठेतरी खोल रुतून बसलेला होता. खरं तर आमचं पूर्वीपासूनचं असे बोलणं झाल्यामुळे. त्याचा बेस बेकेटचा होता. चर्चा चालायच्याच. तरी मला असं वाटायचं की, बेकेटवर बेस केलेल्या ज्या ज्या फिल्म्स निघाल्या, त्यांच्यामध्ये बेकेटच्या वाट्याला काहीच आलं नाही. तो राजा जो आहे, खुद्द बेकेटमध्ये काम केलेला हा जो माणूस आहे, राजाचं काम केलेला, त्याला त्या काळामध्ये पहिले श्रेय मिळालेलं आहे. याचं कारण काय, तर त्या कॅरेक्टरला खूप पदर आहेत. ते सगळे जसेच्या तसे मी उचलले आहेत. आणि या हिंदूरावाला लावले आहेत.

तो त्या स्वातंत्र्य सैनिकाचा जरी अपमान करत असला तरी त्याच्याविषयी त्याला ओढही आहे. त्याचं मोठेपण त्याला कळतंय. पण अशा प्रकारच्या मोठेपणातून एवढे साम्राज्य करण्याची ताकद असल्या माणसात नसते. असल्या माणसाने एकतर शरण यावं माझ्यासारखं त्या माणसाला आणि आपलं आयुष्य आता बरं काढावं, कारण तुमचा मोठेपणा आता या समाजाला माहीत नाही. तर इतके पदर आहेत त्या भूमिकेत की, समोरचा हा माणूस आपल्याला उध्वस्त करू शकतो हे माहीत असूनसुद्धा त्याच्याबद्दल एक आंतरिक सहानुभूती असते. त्याचा मोठेपणा त्याला अतिशय उत्तम पद्धतीने कळतो. या माणसाने चांगलं चांगलं खावं, चांगलं राहावं आणि माझ्यात सामावून जावं, म्हणजे तुमचे शेवटचे दिवस बरे जातील, अशा स्वरूपाचा विचार करणारा हा माणूस आहे. ते इतके पदर त्या हिंदूरावाच्या कॅरेक्टरला आहेत.

या सगळ्यामध्ये अर्थातच डायरेक्टरशी जमणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. मला डायरेक्टर्स सुदैवाने चांगले मिळाले. आता जब्बार म्हणा किंवा, राजदत्तजी, महेश भट म्हणा, अण्णांनीही आम्हांला कधी अ‍ॅक्टिंग शिकवली नाही.

सामान्य माणसाची प्रतिक्रिया तीव्र असायची. पत्रं खूप यायची. मी जिथे जायचो तिथं भयंकर गर्दी असायची. शेवटी कधीकधी इतर आर्टिस्टना खूप अवघडल्यासारखं व्हायचं. बाजूनं ट्रक जात असेल तर ट्रकवाले आतून ओरडायचे, ‘निळू फुले’.

मुळात माझा अतिशय मवाळ स्वभाव. प्रकाशात न येण्याची माझी वृत्ती. पण कॅमेर्‍यापुढे आल्यावर मात्र वाघ बनायला होतं. याचं कारण त्यातली इन्व्हॉल्व्हमेंटच असते. तरी हे मात्र जाणवतं की, हे यश येतं आणि जातं. मी अशीही माणसं पाहिली की त्यांना रस्त्यात कुणी ओळखतही नाही. हा जो अलिप्तपणा येतो मनाला, ते अवतीभोवतीच्या मोठ्या माणसांचे, वाचनाचे संस्कार आहेत. सेवादलाच्या चळवळीचाही प्रभाव असावा. ज्या क्षेत्रामध्ये मी वावरतो त्या ठिकाणी जाहिरातबाजी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.

पण काही माणसांना त्याचं काही विशेष नाही वाटत. अशी माणसंही आहेत. अनेकवेळा मलाही अवघडल्यासारखं झालं आहे की, आपल्याभोवती सतत गर्दी, आणि खूप माणसं आपल्यापैकी अशी की, ज्यांच्याभोवती माणसं नाहीत, हासुद्धा भांडणं लागायचा, संघर्ष सुरू होण्याचा मुद्दा आहे. एखादेवेळी
हॉटेलमध्ये, लॉजमध्ये, किंवा एखाद्या मेजवानीच्या प्रसंगी लोक तुमच्याच पुढे पुढे करून तुम्हाला अधिक सर्व्ह करायचा, तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करतात. अवतीभोवतीच्या तुमच्या आर्टीस्टमध्ये हे भांडणाचं मूळ होऊ शकतं. मी एक पथ्य पाळलंय की, कितीही मोठा माणूस असला आणि कितीही छोटा माणूस असला तरी त्यांच्याशी वागण्यामध्ये मी कधी भेदभाव करत नाही. आता काही मंडळी जी असतात ज्यांना वाचन किंवा फिल्ममधले अतिशय बारकावे कळतात. अशा मंडळींशी गप्पा मारण्याचा आनंद फार मोलाचा असतो. अशी मंडळी दौर्‍यामध्ये येतात आणि ती तुम्हाला तुमच्यातलं काय काय योग्य आहे, मोठं आहे, खरोखरच तुमच्यात कस आहे की नाही, अशा स्वरुपात समजून सांगतात. त्यांच्याशी बैठक होऊ शकते चांगली.

मला अशा लोकांशी गप्पा मारायला निश्चित आवडतं. विशेषतः ग्रेसशी बोलणं. मी विचार करायला लागतो की, यांच्या कविता जर आपल्याला समजायच्या असतील तर या माणसाशी बोललं पाहिजे. या माणसांचे, जे भावबंध आहेत, याचं जे आयुष्य आहे, किंवा तो ज्या पद्धतीनं विचार करतो किंवा जी प्रतिकं वापरतो याचा त्याने जीवनात जे काही भोगलंय त्याच्याशी अतिशय निकटचा संबंध आहे. तेव्हा अतिशय दुर्बोध असणारी अशी त्यांची कविता त्यांच्याशी बोलल्यानंतर सोपी झाली. त्यांनी मला मितवा नावाचं पुस्तक दिलं. ते वाचलं आणि मला असं वाटायला लागलं की, अवघड नाहीये हे. सोपं आहे. तर एखादी कविता, एखादी कलाकृती समजून घेण्यामध्ये ज्या अडचणी असतात, त्या निघून जाणं आणि ती तुम्हांला सोपं वाटणं, हासुद्धा एक प्रवास आहे. अशा माणसांशी बोलताना निश्चितच एक निराळाच आनंद वाटतो.

हा आनंद मी माझ्या आयुष्यात फार वेळा घेऊ शकत नाही, याबद्दल खूप खंत वाटते. आपण कशाला एवढे मोठे झालो, असं वाटतं.

मला माझ्या पद्धतीने आयुष्य जगता येत नाही. नाहीतर खरं मी पुस्तकात रमणारा माणूस आहे. माझ्या आवडीची पुस्तकं असली आणि बाकी काहीही नसलं, अगदी जेवणसुद्धा नसलं तरी मला विशेष वाटणार नाही. चहा, पुस्तकं, सिगरेट एवढं असलं ना, की मी अख्खा दिवस त्याच्यावर राहू शकतो. आता एखादा दिवस मला असा मिळतो. विशेषतः मी उठतो लवकर, मग चांगली पुस्तकं घेऊन बसतो आणि मग ते साधारण दोन-तीन तास उजाडेपर्यंत मस्त जातात. आणि संबंध दिवस मग चांगला जातो. म्हणजे मला तेवढा दिवस चांगला वाटण्याइतकं ते पुरं होतं. तुमच्यातील क्रिएटिव्ह शक्तींना कुठेतरी अगदी ‘राख झाडण्यासारखं’ होणं म्हणतात ना, तसं होतं.

चित्रपटांमध्ये मात्र माणसं सुरुवातीला ‘आपण काहीतरी नवं शिकू’, या ज्या उमेदीनं येतात, ती उमेद संपते आणि माणसं हळूहळू कमर्शियल बनत जातात. मी स्वत:सुध्दा. अगदी कुणीही तिथं राहिला तरी कमर्शियल बनतो. त्यामुळे मी कितीही नको असलेल्या डायरेक्टर्सबरोबर दहा-दहा पिक्चर्स केलेली आहेत. मला माहीत आहे याच्यात काही नाहीये. दिवस वाया जाणार आहे. बरं त्यातून काही पैसेही नाही मिळणार. तरी मी त्यांची पिक्चर्स पूर्ण केली. आणि ते जे सगळं मी दाखवलेलं असतं ना, मला असं वाटतं की, ते ड्रिंकमध्ये उफाळून येतं. मग मी आक्रमक होतो. मला त्याचा अतिशय पश्चात्ताप होतो की, हे चूक केलं आपण. पण ते होतं खरं त्या काळात आणि आता ते कमी झालं. त्याचं कारण असं की, आता मी जरा लोकांना सांगायला लागलोय की मला नाही आवडत हे. नको वाटतं हे, मला नाही करायचं हे. अगदी कितीही मोठया ऑपॉर्च्युनिटिज आल्या तरी मी त्या टाळल्या.

आता मला जे जे आवडेल ते मी करीन. अट एवढीच की, मला माझ्या पद्ध्तीनी जगू द्या. गेल्या दोन वर्षामध्ये हमाल दे धमाल जर सोडलं, तर फार असा मी कुठे अडकलेलो नाही.

या सगळ्या भानगडींमध्ये पैसेही बुडले. इतरही मनस्ताप. पण तसं खरं सांगायचं तर अपेक्षेपेक्षा पैसे मला जास्त मिळाले. एवढी माझी कधीच अपेक्षा नव्हती. बुडालेही म्हणा खूप. ३०-३५ टक्के पैसे माझी बुडालेले आहेत. पण मला नाटकांसिनेमांतून इतके मिळत होते की, मला त्या बुडालेल्या पैशाविषयी काही वाटले नाही. पाच हजार बुडाले तर मला दुसर्‍या दिवशी दहा हजार मिळत होते. कुठेही २-४ तास काम केलं की मला लोक पैसे आणून द्यायचे.

पण मी एक ठरवून ठेवलं होतं की, आपल्याला मिळालेल्या पैशापैकी एवढे पैसे मागे गेले पाहिजेत. मुलाबाळांसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे असा व्यवहारी विचार मी केला.

इतके पैसे मिळायला लागले तर चांगले आणि वाईट परिणाम होऊ शकतात. पण माझं तसं झालं नाही. मला उलट ते फार भयंकर झालं. मला असं वाटू लागलं की, हे अतीच मिळायला लागलेत. अतिशय भान ठेवून असायचो.

पण जास्त पैसे मिळत गेले म्हणून स्पॉटवर नखरे कधीच केले नाहीत. आम्ही मित्रमंडळींबरोबर खायला गेलो की आवडीचंच खातो. त्याठिकाणी कोळंबी आहे, मच्छी आहे. यातले सगळे प्रकार आहेत अशाच ठिकाणी एरवी खाणार. पण स्पॉटवर नखरे नाहीत. असं आम्ही कधीच केलं नाही.

आणि असा हा अनुभव मला साऊथमध्ये सगळीकडे मिळाला. तिथल्या लोकांचं नि आपलं, का कुणास ठाऊक, बरंच चांगलं आहे. कारण त्यांच्यातले इव्हन आर्टिस्ट डायरेक्टर्स हे मुंबईमधले आर्टिस्ट ज्या स्वरूपात राहतात, तसे नाहीत. ती सगळी मंडळी, असं वाटतं की, ही मराठीच मंडळी असावीत. त्यांचं राहणं, वागणं, बोलणं वगैरे तक्रारी नाहीत. काम करायचं म्हणजे कसून करायचं आणि कसून खर्च करायचा. काम चोख आणि व्यवहार चोख.

या प्रादेशिक चित्रपटांची अवस्था चांगली आहे, ती याचमुळे असं मला वाटतं. त्याचं कारण असं की, त्यांच्यात स्पर्धा नाही. तामिळमध्ये फिल्म केली तर काढताना ती तीन भाषांमध्ये डब करतात. तेलगू, तामिळ आणि मल्याळम. तिथे त्यांचं बजेट आपल्या हिंदी चित्रपटांसारखंच खूप असतं आणि त्यातले कलाकार, डायरेक्टर किंवा टेक्नीशियन्स यांना जो पैसा मिळतो, तो आपल्या हिंदीवाल्यांइतकाच मिळतो. त्यांच्या धंद्याला एक शिस्त आहे. पहिली गोष्ट साऊथमध्ये काय असेल, तर व्यवहार अतिशय स्वच्छ. काय असेल ते असो. दुसरी गोष्ट, त्यांच्यात्यांच्यात मारामार्‍या असतील, पण एखाद्या निर्मात्यानं बुडवलं हा प्रकार नसतो. अगदी अपवद. मला वाटतं की, उत्तर प्रदेशापेक्षा ही माणसं अजून तरी जागरूक आहेत. व्यवहारात चोखही आहेत, सज्जनपणाचा अंशही जास्त आहे.

प्रादेशिकतेचा अभिमानही आहे. बाकीचं काय असेल ते आपल्याला नाही सांगता येणार, पण अजून तिथं मूल्यं मानली जातात. अनुभवच असा आहे. कुणालाही कधी फारसं फसवलं जात नाही. आणि योग्य श्रमाचा मोबदला दिला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे, असं मानणारे लोक तिथे आहेत.

अशा सगळ्या चांगल्यावाईट डायरेक्टर्सबरोबर काम केलं. सगळे बरेवाईट अनुभव घेतले. पण नवीन लोकांमध्ये हा स्पार्क कितपत आहे, सांगता येत नाही. तसं आपल्याकडे मराठीत अजून कुणीच नाही. म्हणजे सचिनसारखा माणूस कसा आहे की, उत्तम कमर्शियल फिल्म कशी करायची याची त्याला उत्तम जाण आहे. वर्कआउट ही चांगलं करतो. पण आता पुन्हा तेच तेच होतं. पुन्हा त्या हिंदीवाल्यांचीच नक्कल करतात. याच्यापेक्षा निराळी उडी ज्यादिवशी घेईल तो, त्यादिवशी सगळा कस लागेल त्याचा. आजचं काही सांगता येत नाही.

नवीन आर्टिस्ट मात्र काही काही चांगले आहेत. या सिरीयल्समधून काही फारच चांगले आर्टिस्ट्स आहेत, यायला लागलेत. मराठीमध्ये चंदू पारखी मला वाटते की चांगला आहे. त्याला जर विविध भूमिका मिळाल्या तर चांगलं करेल तो.

या सगळ्या नवीन लोकांकडे, नव्या घडामोडींकडे पाहिलं की वाटतं, काही गोष्टी तर आपल्या हातून राहूनच गेल्या. आज वाटतं की, उत्तम फिल्म्स लिहिण्याचं काम राहून गेलं माझ्या हातून. मी छान स्क्रीप्ट रायटिंग करू शकलो असतो. अति उत्तम. असा मी प्रयत्न जो काय थोडा फार केला होता. तेंडुलकरानी सांगितलं की, फारच चांगली आहे. हे तू करच, चांगलं आहे. मला असं वाटतं की ते राहून गेलं. फिल्मचं उत्तम स्क्रीप्ट लिहिणं म्हणजे काय हेसुद्धा कळायला हवं. कॅमेर्‍याशी चांगला संबंध आल्यामुळे ते करू शकीन.

मला चांगलं संगीतही आवडतं. त्यातले फार बारकावे, तपशील माहीत नाहीत पण ते भावतं. भयंकर गोड लागतं. शास्त्रीय असलं तरी खूप भावतं. आज तरी मला असं वाटते की, मला त्यातले हे राग वगैरे नाही सांगता येणार. पण चांगल्यावाईटाची कल्पना येऊ शकते.

याशिवाय काम करायला आनंद मिळतो ते काही ठरावीक लोकांबरोबर. मस्त वाटतं. त्यातला एक अशोक. उत्तम मराठी स्टार. दुर्दैवाचा भाग एवढाच की, त्याला कामं मिळत नाहीत तशी. त्याच्यावरही एक शिक्का बसलाय. आणि तो असा बसलाय विचित्र की, आता ते त्यालाच कठीण झालय बदलणं. उत्तम आर्टिस्ट. हिरो ओरिएन्टेड कामापेक्षा कॅरेक्टर रोल्स तो फार उत्तम करू शकतो. मग मराठी, हिंदीतल्या आवडत्या माणसात नसीर सर्वात खूप ताकद असलेला माणूस. ओम पुरी, कमल हसन, अगदी नसीरच्या जोडीनं घ्यायला हरकत नाही. त्यांच्यामध्ये विशेष म्हणजे कमर्शियल फिल्ममधलं सगळं आणि पुन्हा एखाद्या प्रायोगिक फिल्म्समधलं सगळं हे दोन्ही त्यांच्याकडे आहे. अनुपम आहे. अर्थात त्याचा हे लोक वापर करत नाहीत, पण तो ताकदीचा माणूस आहे. अमरीश पुरीसुद्धा तसा ताकदीचा माणूस आहे.

नट्यांमध्ये खरं स्मिता, शबाना किंवा दीप्ती यांच्या आसपास जाणारं कोणी दिसत नाही.

जुन्या जमान्यातले बलराज, मोतीलालजी, बाबुराव पेंढारकर, अन्वर हुसेन आणि याकूब, जी काही मी याकूबची कामं पाहिली त्यात इतक्या विविध प्रकारच्या भूमिका करणारा माणूस नाही पाहिला. फारच अप्रतिम. तसंच ललिताबाई, मीनाकुमारी, वहिदा, दुर्गा खोटे, शांताबाई आपटे, गौरी नावाची जी आहे तुकाराममधली, तीही.

रंगमंचावर दत्ताराम, मामा पेंडसे ही दोन मंडळी. मामांचं सवाई माधवराव वगैरे मधलं काम, अतिशय कौटुंबिक जिव्हाळ्याचं बाळ कोल्हटकरांचे नाटक होतं दुरितांचे तिमिर जावो. त्यातलं मामांचं काम, एखादी अतिशय अतार्किक घटनांनी भरलेलं नाटक तार्किक वाटावं असं. एखादा नट असं करू शकतो, ते मामांनी पटवून दिलं. मामासाहेबांनी माझ्यावर खूप प्रभाव टाकला. सतीश दुभाषी, प्रभाकर पणशीकर, मामा आणि दत्तारामांची जात कुठेच नाही मिळाली. रंगमंचाबाहेरचे दत्ताराम आणि रंगमंचावरचे दत्ताराम दोन भिन्न व्यक्ती वाटाव्यात. विश्वास वाटू नये की हे ते आहेत म्हणून.

त्यांचा एक किस्सा फार चांगला आहे. रायगडाला जाग येतेला गोवा हिंदू चं कर्ज होतं आणि त्यावेळेला ते भयंकर जोरात चाललं होते. त्यांच्या जोडीला काशिनाथ काम करायचा आणि काशिनाथ काहीतरी पैसे वाढवून मागत होता. तर गोवा हिंदूवाल्यांनी दिले ते. दत्तारामजींना कळायला नको म्हणून त्यांनाही एक पाकीट वाढवून दिलं. त्यांनी आपलं पाकीट खिशात घातलं, पण त्यांच्या लक्षात आलं की, आपल्या खिशात पन्नास-पंच्याहत्तर रूपये जास्त आहेत. ते तसे पैसे घेऊन आले आणि म्हणाले की, यात जास्त पैसे आहेत मला याची गरज नाही. हे मला नको. दुसर्‍या कुणाला तरी द्या.

ते तर खरं काही शिकले नव्हते. पण ही अभिनयातली ताकद मला वाटतं अनुभवातून येते. जीवन जे भोगलंय त्यातून येते. आणि जो आपण धंदा करतो त्याचा तो श्वास आहे. त्याच्याशी संलग्न ज्या स्वरूपाची वागणूक करायला हवी याच्याबद्दल जी नैतिक बंधनं असतात तसा तो पिंडच बनलेला माणूस असतो त्याला असं वाटतं. अरे ह्या इमारतीची ही भिंत ढासळून चालली बरं का. मला त्यांनी जास्त पैसे दिले आणि ते स्वीकारले तर असं असं होणार आहे. असं नाही होऊ द्यायचं आपण. आपण ज्या श्रद्धा जपलेल्या आहेत त्यामुळे आपणच उध्वस्त होऊ या भीतीने घेणार नाही. माझा दृष्टीकोन बदलण्याचा संभव आहे. मला नको ते. मी ते ऐकलं नि अतिशय भावून गेलं. काय बुवा माणूस असेल. मी त्यावेळेला असतो तर नसतं असं केलं. कारण नंत नंतर मीसुद्धा म्हणायला लागलो की, मला वाढवून द्यायला पाहिजे. माझ्याबरोबरचे इतर लोक वाढवून घ्यायचे. त्यांची लायकी नसतानासुद्धा घ्यायचे. खूप त्रासदायक वाटायला लागतं. माझी किंमत मला तुम्ही द्यायलाच हवी. खरं म्हणजे ती मी केव्हाही मागितली असती तरी मला त्यांनी ती दिली असती. पण मला ते उशीरा कळायला लागलं. आणि त्यांनीही ती स्वतःहून वाढवून दिली नाही.

त्याबद्दल खंत नंतर वाटतच राहिली. आयुष्यात कळत नकळत चुका घडण्याचे प्रसंग अनेक आहेत. मी दुखावलंय माणसांना. ते माझ्या मनात मात्र खूप घर करून आहे. पण माझ्यात एक चांगली गोष्ट, मला वाटतं की, मी कधी चुकलो तर त्या माणसाकडे डायरेक्ट जाऊन क्षमा मागायची हिंमत माझ्यामध्ये आहे. मी रात्री भांडलो ना, तर सकाळी जाऊन मी क्षमा मागेन. ‘सॉरी’ म्हणेन आणि मी संबंध नाही मोडणार. संबंध मी कायम ठेवतो.

एकंदर आयुष्याबद्दल असं वाटतं की, संसार, लग्न या प्रवृत्तीचे आपण नाही. हे माझ्या फार उशिरा लक्षात आलं. आपण बिल्कुलच त्या लायकीचे नाही, घर करुन राहण्याच्या. आपण फकीर आहोत. आणि आपण जर सिनेमाची, सगळी तंत्रं अवगत केली असती तर आपण बर्‍याचश्या चांगल्या गोष्टी करू शकलो असतो, याची मला नेहमीच खंत वाटते. मला वाटते की, मी उत्तम स्क्रीप्ट रायटर झालो असतो. मी फारच अफलातून गोष्ट करू शकतो, पण भिडस्त स्वभावामुळे ते करू शकलो नाही.

लग्न केलं आणि संसार मांडला याचं दु:ख नाही. पण त्यामुळे बंधनं आली. आपण या लायकीचे नाही, ही गोष्ट मला उशीरा कळली. लोकांनाही त्याचा त्रास होतो. साधारण संसारी माणूस ज्या पद्धतीनं वागतो, संसार करतो, आदर्श संसाराच्या त्यांच्या ज्या कल्पना असतात ना त्यात आपण बसूच शकत नाही. कारण एखादा चित्रपट पाहण्यासाठी मी सरळ चक्क उठून मुंबईला जायचो किंवा एखाद्या नाटकासाठी कुठेही जायचो, किंवा एखादी मैफिल ऐकायची आहे किंवा एखादा डान्स पहायचा, त्यासाठी काहीही करायचो. एखादे पुस्तक हातात घेतलं माझ्या कल्पनेप्रमाणे मी कितीही मोठं पुस्तक असलं, हजार पानांचं, तरी ते मी एका बैठकीला संपवलेलं आहे. म्हणजे ही जी तार लागणं म्हणतात, ते तार लागणं माझं तुटलं.
दुसरं म्हणजे स्त्रियांबद्दलचं आकर्षण. मी स्त्रीचा असा स्वतंत्रपणे विचार केलेला नाही. मी संसारालासुध्दा लायक नाही. तसंही मला कळतं की, ती शरीराची किंवा आपण जे काही दिवसभर केले ते कुठेतरी बोलून दाखवण्याची जागा आणि मग शारीरिक संबंध, हे यानंतर मग कुठेही अडचणीचं होता कामा नये असं. त्या वेळी फार कटकटीचं होतं. मला एखादी स्त्री माझ्यात इन्व्हॉल्व्ह झाली आणि ती मला व्यापून टाकायला लागली की मला नाही आवडत. तिनं कब्जा नाही करता कामा. तिने वेसण नाही घालता कामा आणि तिनं सातत्यानं माझ्या जवळ असणं, हेही मला नाही आवडत.

माझे जे मित्रमैत्रिणी आहेत, ते स्वतंत्र आहेत आणि ते तुम्हालाही तसेच स्वतंत्र ठेवू इच्छितात. त्यांनाही ते आवडत नाही की, तू व्यापून टाकणार माझं आयुष्य आणि तुझ्यावर मी व्यापून राहणार. अशी स्त्री-मैत्री असू शकते. असे काही मित्र आहेत ज्यांची नावे घेणे बरे नाही, पण आहेत. ते एकमेकांना कुठेही जड होत नाहीत. एकमेकांना कुठेही ऑकवर्ड करीत नाहीत. ते एकत्र येतात, एकत्र राहतात आणि निघून जातात, ते कळवतसुध्दा नाहीत. पुन्हा ते अधिक चांगल्या पध्दतीने एकत्र येऊ शकतात. बिलकुल एकमेकांना तुमच्या व्यक्तिगत, खाजगी जीवनाबद्दल कसलाही संबंध नाही, आकस नाही, नुसता सहवास.

ही गोष्ट खरी आहे की, आज आता आयुष्याचा बराच काळ उलटून गेला आहे. स्वत:चा प्रवास घडत असतानाच सामाजिक कार्यातही माझ्या परीनं सहभागी झालो. सेवादलाच्या आणि समाजवादी विचारांचा सतत पाठपुरावा केला. ह्या सार्‍याबद्दल, आजकालच्या परिस्थितीबद्दल मी आज काही निश्चित आग्रहानं, ठाम भूमिकेतून बोलू शकतो. आजचा सामाजिक जीवनाचा चेहरामोहरा संपूर्ण बदलून गेला आहे. जीवनाला अतिशय वेग आलेला आहे. त्यामध्ये आपण मानलेली मूल्यं, आपण कसं जगायचं या समाजामध्ये, परिसरामध्ये, त्याच्याबद्दल जे काही आडाखे केले होते ते सगळे साफ धुळीला मिळाले आहेत. अशावेळी कुठलीही व्यक्ती म्हणून एक तर संघर्ष तर करतेच, त्या त्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन जगण्याचा प्रयत्न करते.

एक तर उघडच आहे की, या स्वरूपाची जी वैज्ञानिक प्रगती झाली आहे तिचा मोठा फायदा असा झालाय की, कितीतरी गोष्टी, अवकाशातल्या किंवा सागरासारख्या, आतापर्यंत आपल्याला माहीत नसलेल्या, आणि निसर्गातले अनेकविध चमत्कार आता माहीत झाले आहेत. या सगळया गोष्टींची ओळख किंवा ते आकलन होण्याची एक दिशा सापडली आहे.

निसर्गाची सगळी रहस्यं आपल्याला कळली आहेत असं नाही पण ती शोधून काढण्यासाठी शास्त्र, विज्ञान सर्वात महत्त्वाचे ठरते आहे, ही गोष्ट आज आपल्या लक्षात यायला लागली आहे. उदाहरणार्थ, देवाची कल्पना ही मनुष्यनिर्मित कल्पना आहे असं मला वाटतं. हे जे उत्क्रांत झालेलं जग आहे त्याच्यामागे काही एक विशिष्ट शक्ती आहे, असं काही सापडत नाही. संशोधनातून विश्वाची रहस्ये जसजशी उलगडत जातील तसतशी अंधश्रध्दा आणि भोंदूपणाही कमी होत जाईल.

अर्थात ते जर तुमच्या तरूणपणात आलं असतं तर ते तुम्ही अधिक चांगल्या रीतीने पार पाडलं असतं. सामावून घेऊ शकला असता. साठी, पन्नाशीच्या वयामध्ये सारं आकलन करून घेण्याची क्षमता आणि त्यांच्याबरोबर चालण्याची क्षमता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुध्दा राहत नाही. कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा किती अतिरेक व्हावा, यंत्रं शापवत वाटावीत, विशेषतः ज्या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि माणसाच्या दोन हातांना काम कसं द्यायचं हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना ही प्रगती शापवत ठरते. तर असाही विचार केला पाहिजे की रोजचं जीवन या गतीत सापडल्यामुळे ते भोवर्‍यात सापडल्यासारखं आहे, इथं तुम्ही मानलेली मूल्यं ढासळली आहेत. मूल्यांचे स्वरूप काय तर तुम्ही आता ज्याला भ्रष्टाचार म्हणता ती आता दलाली आहे. आपली, विशेषत: हिंदू माणसाची, विचारांची परंपरा ही अतिशय कुंठीत अशी विचार परंपरा आहे. त्यामुळे या वेगवान जगात आधी आपण मोडकळीला येतो.

या वैज्ञानिक युगामध्ये एक मात्र घडलेलं आहे की, सर्व लोकांच्या, तरूण मंडळींच्या, एवढंच नव्हे तर आपल्या अवतीभवतीच्या सगळ्याच लोकांच्या एकमेकांबद्दलच्या ज्या इमेज होत्या त्या तुटून पडल्या आहेत, निखळून पडल्या आहेत. आताच्या या गतिमान जगामध्ये ही सगळी मूल्यं निघून जात आहेत. पण मला उलट विशेष असं वाटतं की यामुळे एक निखळ प्रेम किंवा निखळ मैत्री वाढायची शक्यता आहे.

आता आम्ही जुन्या पिढीतले आहोत म्हणून हा वेग अंगावर येतो. नवी पिढी या वेगात सामावून जाईल. पण भीती एवढीच की यंत्रवत होतील माणसं.

आज आपल्याकडे असं दिसून येतं की, समाजामधला एक वर्ग अतिशय सधन आहे आणि मोठा वर्ग म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीनं म्हणायचं झालं तर जवळजवळ ५०% लोक अतिशय वाईट अवस्थेत आहेत. कुठल्याही देशाच्या दृष्टीनं राज्यपातळीवर हे लज्जास्पद आहे. पन्नास टक्के माणसं धर्मामुळं, परंपरेमुळं आज सहनशील आहेत. पण राज्यकर्त्यांची पुढची पिढी तुमच्या खिशात हात घालून, पैसे काढून तुम्हांला हाकलून देतील अशी व्यवस्था येण्यापूर्वीच त्यावर काहीतरी इलाज करायला हवा. कारण ही व्यवस्था चहूबाजूंनी आपल्यावर लादली जात आहे. वेगानं अंगावर येणारी ही समाजव्यवस्था फार भयानक आहे. ती बदलण्याच्या ज्या चळवळी आज लढवल्या जाताहेत त्यातला मी एक साथी.

ह्या आयुष्याचा रोखठोक हिशोब मांडावा असं काही वाटत नाही. खूप काही कमावलं आणि गमावलंही. मी जसा आहे तसा तुमच्या पुढं आहे.
*********************************************
मी : निळू फुले!

मुलाखत व शब्दांकन : श्रीराम रानडे
पूर्वप्रसिद्धी : किस्त्रिम नोव्हेंबर १९८९
छायाचित्रं: दिलिप कुलकर्णी (मूळ लेखातून साभार)

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा


* कवी – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर         * संगीतकार – शंकरराव व्यास * मूळ गायक – ललिता फडके, व्ही. जी. भाटकर

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा । 
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।

रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा।।

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंव्ह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दरिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।


* कवी – राजा बढे       * संगीतकार – श्रीनिवास खळे        * मूळ गायक -शाहीर साबळे व समूह

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!  • प्रशांत पाटील.: जवळपास सगळ्यांच्याच मनातली गोष्ट ऊघडपणे आपण मांडली आहे.
  • sandip: Khupch chhan kavita aahet
  • dinesh chavhan: namskar, kusumagraj yanchi kavita,internet var aalyane khup aannand zala.marathi madhale abhijat sahitya netvar yave hi kalachi garaj zali aahe.tumch

प्रवर्ग