Information Hub

राजू परुळेकर – लोकप्रभा

Posted on: सप्टेंबर 7, 2009

राजू परुळेकर
वांद्रे-वरळी सेतू समारंभाला मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह अनेक गौण माणसं उपस्थित होती, पण त्यात मुख्य माणसं होती ती सोनिया गांधी आणि शरद पवार. आयुष्यभर आपण शरद पवारांना ‘मराठा स्ट्राँगमन’ या बिरुदावलीने गौरवत आलो. ते आपल्याला शाहू, फुले, आंबेडकर या नावाने गंडवत आले; या गोष्टीचं रहस्य त्या दिवशी उघडकीला आलं. या सागरी सेतूवर त्यादिवशी एका बलदंड मराठय़ाच्या लाचारीची लक्तरं मुंबईच्या अरबी समुद्रावर लोंबणार होती.
शरद पवार यांनी या समारंभात धावत पुढे होऊन या वांद्रे-वरळी सेतूला ‘राजीव गांधी’ यांचं नाव दिलं. एकेकाळी जहागिऱ्या आणि वतनदाऱ्यांसाठी मोगलांचं मराठे कसं लांगुलचालन करत असतील त्याचं मूर्तिमंत चित्र शरद पवारांनी उभं केलं.

पवारसाहेब एवढं करून थांबले नाहीत, तर त्यांनी परत धावत जाऊन राजीव गांधींचा जन्म मूळचा गिरगावातला असल्याने ते मूळचे मुंबईकर- महाराष्ट्रीय असल्याचा, साखर काढून झाल्यावर इथेनॉल काढल्यासारखा खुलासाही केला. हे सारं ऐकताना सोनिया गांधी मनात त्या वेळेच्या मोगलांसारख्या हसत असणार. दुसरीकडे महाराष्ट्राचे केसात सतत हात फिरविणारे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दिल्ली दरबारी निष्ठा राखण्याकरता या पवारांच्या प्रस्तावाला जोरदार आवाजात व तर्कात समर्थन देते झाले. याबद्दल महाराष्ट्रातून फारसा चकार शब्दही निघाला नाही, हे आश्चर्यकारक होतं.
दिल्लीत पवारसाहेब मराठा स्ट्राँगमन म्हणून ओळखले जात. पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार असताना शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्या वेळी एका जाहीर समारंभात जे.आर.डी. टाटांनी भारताचा पंतप्रधान होण्याची क्षमता असलेला भावी पंतप्रधान असा पवारसाहेबांचा उल्लेख केला होता. तेव्हा पवारसाहेब एवढे तरुण होते की ते जवळजवळ पंतप्रधान झालेच असं बऱ्याचजणांना वाटलं. त्यांच्या समाजवादी साथींना आणि फायदाकरू पत्रकारांना तर नक्कीच. धर्मनिरपेक्षतेपासून ते शाहू, फुले, आंबेडकरांपर्यंत साऱ्यांचे ते प्रतीक बनले. पुढे पवारसाहेब पंतप्रधान सोडाच, साधं महाराष्ट्रात दोनतृतीयांश बहुमत आणून सरकार आणू शकले नाहीत; किंबहुना महाराष्ट्रात आपण हव्वा केलेल्या ठाकरे वा पवार या नेत्यांना २८८ मधल्या ६०-७० च्या वर जागा कधीच जिंकता आलेल्या नाहीत. उद्धव व राज ठाकरे किंवा अजित व सुप्रिया पवार (सुळे) यांनी हे लक्षात घेण्यासारखं आहे.
दक्षिण वा उत्तरेकडची अनेक राज्यं अनेक नेत्यांनी दोनतृतीयांश बहुमतांनी एकहाती जिंकताना पाहत असताना आपण पवार-ठाकरेंना महानेते का मानतो, हे आपण लक्षातच घेत नाही! त्याचं सारं उत्तर पवारसाहेबांच्या परवाच्या वांद्रे-वरळी सी-लिंक उद्घाटनाच्या वेळेच्या थिल्लर वर्तनात दडलेलं आहे.
महाराष्ट्राला लोकोत्तर पुरुष-स्त्रियांची मोठी परंपरा आहे, हे पवारसाहेबांना माहीत नसावं. खरंतर वांद्रे-वरळी सेतूसाठी सर्वात अचूक नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, कारण ज्या नेहरूप्रणीत कमिशनने मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, यासाठी जंग जंग पछाडलं होतं, त्यांचं ऑग्र्युमेंट डॉ. बाबासाहेबांच्या वकिली कौशल्यामुळे आणि मुंबई व इथल्या मराठी माणसावरील प्रेमामुळे लुळं पडलं. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या वकिली कौशल्याने लढून गुजराती-मारवाडी व्यापाऱ्यांच्या घशातून मुंबई महाराष्ट्रात आणली, हे आज विस्मृतीत गेलंय. त्यांच्या त्या मुंबईसाठीच्या ऑग्र्युमेंटचं पुस्तक मराठीत भाषांतरित केलंय ते वि. तु. जाधव यांनी. डॉ. बाबासाहेबांच्या पुत्रानेच ते बाबासाहेबांच्या हयातीत प्रसिद्ध केलंय.
तर तार्किकदृष्टय़ा, भावनिकदृष्टय़ा व राजकीयदृष्टय़ा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचंच नाव अजित गुलाबचंदच्या त्या वांद्रे-वरळी सेतूला एकमेव पर्याय होता. पण आपला मर्द-मराठा नेता थिल्लर गळपटपणा करून राजीव गांधींचं नाव त्या सेतूला का देता झाला? कोण हे राजीव गांधी? मुंबई-महाराष्ट्र व मराठी माणसासाठी त्यांनी काय केलं?
१९८५ साली राजीव गांधी राक्षसी बहुमताने सत्तेत आल्यावर याच पवारसाहेबांचा जीव विरोधी पक्षांच्या सत्तेत रमेना. ते सरळ दहाहजारी मनसबदार म्हणून राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले आणि मुख्यमंत्री बनले! वास्तविक समाजवादी काँग्रेस कायम राहिली असती तर कालांतराने का होईना पवार राज्याचे स्वबळावर स्पष्ट बहुमत आणून नेते झाले असते. शिवाय मधल्या संक्रमणावस्थेत ते देशाचे पंतप्रधानही झाले असते. त्यांचा बुद्धिवाद, चतुरस्रता, मेहनत घेण्याची तयारी, डावपेचात्मक हुशारी (मुत्सद्दीपणा नव्हे) ही सारी त्यांच्या लाचारीच्या व असंयमी व औद्धत्यपूर्ण वर्तनाने पूर्णत: फुकट गेली. ते जर राजीव गांधींच्या फक्त साडेचार वर्षांच्या सुनामीसमोर टिकते तर त्यांची आणि प्रत्येक मराठी माणसाची त्यांनी पंतप्रधान व्हावं ही इच्छा फलद्रूप झाली असती. पवारसाहेब हे काय केलंत तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांचं?
पण ही त्यांची पहिली वेळ नव्हे, असं करण्याची. शंकरराव चव्हाणांचा त्यांनी असाच बळी दिला होता. आजवर आपण त्या वेळचे काँग्रेसचे हुकूमशहा इंदिरापुत्र संजय गांधी यांना महाराष्ट्रात बोलावून त्यांचे जोडे उचलतो, असा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना मराठा अस्मितेचे मारेकरी म्हणून लाख शिव्या घातल्या असतील. अलिकडेच राज ठाकरेंसारख्या लोकप्रिय व सद्गुणी नेत्यानेही याचा विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वडिलांच्या संदर्भात हाच लाचारीचा उल्लेख केला, पण वास्तवात महाराष्ट्राला, मराठी लोकांना पवारांविषयी सूक्ष्म अभ्यासाची किती गरज आहे हे मला तेव्हा जाणवलं. मुळात शंकरराव चव्हाणांना संजय गांधी यांच्याविषयी फार ममत्व नव्हतंच; परंतु देशाचं राजकारण आपल्या अमानवी अशा हुकूमशाही वृत्तीने गदागदा लावून सोडणाऱ्या संजय गांधी यांच्या मर्जीतून उतरल्यामुळे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री (तत्कालीन) सिद्धार्थ शंकर रे यांचे जे मातेरे होत होते, त्याची भीती शंकरराव चव्हाणांच्या मनात भरवण्यात आणि त्या भीतीतून त्यांना संजय गांधींना महाराष्ट्रात आमंत्रण देण्यास भाग पाडण्यात शरद पवारांनीच पुढाकार घेतलेला होता. अप्रत्यक्षपणे शंकररावांना संजय गांधींचे जोडे उचलायला शरद पवारांनीच भाग पाडले. जगन फडणीसांची (सत्तेचे मोहरे- ग्रंथाली प्रकाशन- व शरद पवार धोरणे व परिणाम- मेहता पब्लिशिंग हाऊस.) ही दोन पुस्तके आता बाजारातून अनाकलनीय रीतीने गायब आहेत. (माझ्याकडे ती आहेत.) त्या पुस्तकात गांधी परिवाराचे तो परिवार सबळ झाल्यावर जोडे उचलण्याची किंवा जोडे उचलण्यास प्रवृत्त करण्याची शरद पवारांची खरी कहाणी समोर येते. बिच्चारे चव्हाण पितापुत्र सत्तेशी आपला सेतू बांधून घेण्याकरता शरद पवारांनी त्यांना गांधी घराण्याचे जोडे उचलायला लावले.
व्यक्तिश: मी शरद पवारांच्या अनेक गुणांचा चाहता आहे. ज्या पद्धतीने ते एखाद्याचा ‘जगमोहन दालमिया’ करतात तो गुण मला फार आवडतो. एका पवारांसारख्या मराठी नेत्याने पूर्ण गांधी घराण्याचा ‘जगमोहन दालमिया’ केला असता तर मला ते अभिमानास्पद वाटलं असतं. पण राजकारणाच्या महाभारताच्या या अखेरच्या पर्वातही त्यांनी (प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने) दिल्लीचे जोडे महाराष्ट्राच्या देवघरात ठेवले हे किती शोकान्त आहे.
वस्तुत: पवारसाहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणाचे सूक्ष्म ताणेबाणे माहीत आहेत. त्यांच्या पुतण्याला मा. अजितदादा पवारांना ज्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या जिमिनींची सूक्ष्म जाण आहे (!) व त्यावर ते नामी-बेनामी अहोरात्र काम करत आहेत. (ज्यावर नंतर मी सविस्तर लिहिणारच आहे.) त्या प्रकारचं कौशल्य -पण सकारात्मक पद्धतीचं- मा. शरद पवारांकडे आहे. But he missed the bus!
ज्या काँग्रेसने मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना (काजरोळकर नावाचा उमेदवार उभा करून) निवडणुकीत भयावह विरोधी प्रचार करून पाडलं, त्या काँग्रेसचं राजकारण केवळ सत्ता येते म्हणून पवारांना ते पुरोगामी वाटतं?
पवारसाहेबांचं आणि माझं एक रक्ताचं नातं आहे. ते नातं मराठीपणाचं आहे. त्यांचं काही भव्य झालं जे त्यांच्या गुणवत्तेनुसार आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं, तर मला कपर्दिक फायदा नसूनही हर्षवायू होईल. कारण आमच्यातल्या केमिस्ट्रीचा मूळ पुरुष छत्रपती शिवाजीराजे भोसले हेच आहेत. पवारसाहेब, आतापर्यंत दिल्लीसमोर कणा वाकवून काय मिळतं हे तुम्हाला कळलं नाही का? उद्या राजकारणात तुमचं पतन झालं तर हिरानंदानी, दिवाण वगैरे दुसरे पवारसाहेब शोधतील. रडेल तो फक्त भोळाभाबडा मराठी माणूसच..
कधी कधी मला वाईट वाटतं की, मी हे पवारसाहेबांना वयाने फारच लहान असल्याने सांगू शकत नाही. ते ऐकले नसतेच माझं. पण माझं मन हलकं झालं असतं. मला एकदा पवारसाहेबांना ‘अलेक्झांडर द ग्रेट’ या पृथ्वी जिंकणाऱ्या माणसाचे स्मृतिस्थळ माझ्या नजरेतून दाखवायचंय. त्यावर लिहिलंय- ‘‘Bury my body and do not build my monument. Keep my hands outside. So that world knows, who won the World had nothing in hand when he died- Alexander the great.’’
raju.parulekar@gmail.com

source: lokprabha magazine

2 प्रतिसाद ला "राजू परुळेकर – लोकप्रभा"

good article.
some one should b there.

जवळपास सगळ्यांच्याच मनातली गोष्ट ऊघडपणे आपण मांडली आहे. महाराष्ट्राचं जर काही भलं व्हायचं असेल तर ते अशा विश्लेषणानेच होईल. खुर्ची केंद्रीत राजकारणानेच महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s


  • नाही
  • प्रशांत पाटील.: जवळपास सगळ्यांच्याच मनातली गोष्ट ऊघडपणे आपण मांडली आहे.
  • sandip: Khupch chhan kavita aahet
  • dinesh chavhan: namskar, kusumagraj yanchi kavita,internet var aalyane khup aannand zala.marathi madhale abhijat sahitya netvar yave hi kalachi garaj zali aahe.tumch

प्रवर्ग

%d bloggers like this: