Information Hub

Archive for ऑक्टोबर 2009

 समजा शेतकरी संपावर गेले तर काय होईल…
कदाचित उद्यापासूनच आपल्याला दोन वेळ जेवायलाही मिळणार नाही. तुमचा पगार लाखांच्या घरात असला तरी तुम्ही आम्ही अन्नशिवाय जगू शकत नाही, हे वास्तव आहे,
तरीही शेतकऱ्यांकडे आणि त्यांच्या शेतीकडे  दुर्लक्ष का?
यंदा देशात तूर डाळींची टंचाई निर्माण झाली, साखरेचं उत्पादन घटलं तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत चर्चा व्हायला लागली. निसर्गाने साथ न दिल्यामुळे साखर आणि डाळींचं उत्पादन घटलं. जर शेतकऱ्यांनी मुद्दाम सर्व प्रकारच्या अन्नधान्याचं उत्पादन थांबवलं तर काय होईल… ही कल्पनाही किती भयानक वाटते. जर शेतकऱ्यांनी सामूहिक संप पुकारला आणि शेती कसन्यास नकार दिला तर….शंभर कोटी जनतेच्या पोटाची भूक कोण भागवणार…. अन्नधान्याची गरज कोण पूर्ण करणार.

भारताच्या इतिहासात सरकारी कर्मचारी असो की कामगार आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपाचा आधार घेतात. पण शेतकऱ्यांचं काय, ते तर आपल्या समस्यांचं ओझं घेऊन शेतीचा गाडा वाहतात. शेतकऱ्यांनी कधी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला नाही.

महाराष्ट्रात सध्या  संप-आंदोलनाचा सुकाळ आहे. डॉक्टरांचा संप झाला त्यांच्याही मागण्या मान्य झाल्या, त्यानंतर शिक्षकांनीही संपाचा मार्ग स्वीकारुन आपल्या मागण्या मान्य करुन घेतल्या… संपाच्या दबाव तंत्राचा वापर करुन आपल्या मागण्या मान्य करण्यात इतर सरकारी कर्मचारीही मागे राहीले नाहीत… मागे आहेत फक्त शेतकरीच. आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी रोज कोणीना कोणी संप पुकारतोय.

शेतकऱ्यांच्या विरोधात मात्र सर्वच संप पुकारतात, तलाठी संपावर जातात, खत-बियाणे दुकानदार संपावर जातात, मार्केट यार्डात संप होतो, यंदा पावसानंही शेतकऱ्यांच्या विरुद्ध संप पुकारलाय.

पण आपल्या मागण्यांसाठी संपावर जावं असं वाटलं तरी शेतकरी संप करणार कोणाविरुद्ध, त्यांनी संप पुकारला तर 100 कोटी जनतेला अन्नधान्य पुरवणार कोण, या जबाबदारीची जाणीव शेतक-याला आहे आणि त्यामुळेच तो संकटाचा सामना करत शेती टिकवून आहे.

प्रत्येकाच्या मागण्यांपुढं झुकणारं सरकार शेतक-याकडं लक्ष देत नाही ते यामुळेच… आणि म्हणूनच शेतात पीके करपत असली,  दुष्काळ असला तरी सरकार दरबारी मात्र सर्व काही आलबेल असतं, आश्वासनांचा तेवढा सुकाळ असतो.

परंतु आता पाणी डोक्यावरुन चाललंय. शेतकऱ्यांनी आता शांत बसून चालणार नाही. किती दिवस स्वत:च्या जीवाचं बलिदान देत राहणार. आता वेळ आलीय जाब विचारण्याची. झोपेचं ढोंग घेतलेल्या सरकारला जागवण्याची. आपल्या मागण्यांसाठी बळीराजाला एकत्र येऊन लढा सुरु करावाच लागेल. 
मग कुठलातरी कवी पुन्हा लिहील…

 ले मशाले चल पडे है लोग मेरे गांव के
 अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के,

शेतकऱ्यांच्या आयुष्यातला अंधार मिटवण्यासाठी कुठला तरी महापुरुष येईल याची वाट न पाहता आता मशाल घेऊन स्वताच्या हक्कासाठी लढण्याची वेळ आलीय.

Gajanan Umate – http://www.starmajha.com

 दोन बातम्या माझ्या डोक्यातून जात नाहीयत. एक आहे विश्वविक्रमी उसेन बोल्टची आणि दुसरी विनोद कांबळीची. कोण किती ग्रेट आहे आणि कोण किती नशीबवान यात मला फारसा रस नाही. पण एका व्यक्तीला कुठली गोष्ट जिंकत ठेवते आणि एका व्यक्तीकडे जिंकण्याची सर्व साम्रगी असतानाही तो पराभूत कसा काय होतो याची मला मोठी उत्सुकता आहे.

उसेन बोल्ट म्हटलं की कष्ट आणि कष्ट आणि विनोदी कांबळी म्हटलं की नशीब, नियती असे शब्द वापरले जातात. खरं तर विजेत्याला एका चौकटीत आणि पराभूत झालेल्याला दुसऱ्या चौकटीत टाकून आपण मोकळे होतो. पण boris_becker 1.jpgम्हणून काही जय पराजयाचं भयानक वास्तव बदलत नाही. श्वास करपणं आणि श्वास श्रीमंत होणं हे त्यातलंच.

विनोद कांबळी क्रिकेटमधून निवृत्त झाला. खरं तर तो शेवटचा कधी खेळला हेच आठवणं कठीण. त्यामुळे त्याच्या निवृत्तीला महत्व शून्य. लक्षात राहिल असा तो खेळला त्याला दीड दशक उलटून गेलंय. उजवा पाय किंचितसा वर घेऊन हूक मारणार डावखुरा विनोद, डोळ्याच्या बाहुलीवर जशास तसा कोरला गेलाय. मी आता तिशीचा आहे आणि माझ्या विशीत ज्या क्रिकेटर्सच्या प्रेमात पब्लिक पागल होती त्यात कांबळी सर्वात वरचा. सचिनपेक्षाही तो अधिक भावलेला. विनोदला क्रिकेटची देणगी होतीच, याबद्दल शंकाच नाही. पण प्रॅक्टीससाठी लोकलच्या दुसऱ्या वर्गातून प्रवास करणारा विनोद अधिक जवळचा झाला. त्याच्या दिसण्यातलं “गल्ली”पण असेल किंवा त्याच्या नावातला कांबळी शब्द. त्यामुळे तो श्रीमंतांच्या क्रिकेटमध्ये “आपला” जरा लवकरच झाला. क्रिकेटवर अधिराज्य गाजवण्यासाठी खेळाची सर्वकाही देणगी मिळाली असतानाही विनोद अपयशी का ठरला?

       यश आणि अपयश यात एका बाराखडीचं अंतर. “अ”. इंग्रजीत दोन. म्हणजे SUCCESS आणि UNSUCCESS मधे “UN”. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यातलं यश-अपयश या एका बाराखडीत सामावलंय. पण एकाचं आयुष्य Larger than life आणि दुसऱ्याचं आयुष्य “Small things of god”

      माझ्यापेक्षा  तुम्ही सचिन किंवा कांबळीबद्दल  अधिक वाचलं असेल किंवा  ऐकलं असेल. पण ऐकीव हे शेवटी ऐकीवच. ते वास्तवाच्या जवळ असतं पण वास्तव नसतं. त्यामुळे सचिन-कांबळीबद्दलच्या तुलनेत उणीवा राहिल्या तर त्या माझ्या. मी सचिनला भेटलेलो नाही पण कांबळीला भेटलोय. त्याच्याशी फार बोलणं झालंय असंही नाही पण काही काळ त्याचं निरीक्षण केलय. मी झी 24 तासला असतानाची गोष्ट. कांबळीचा  आमच्याकडे शो होता. तो सकाळी चालायचा आणि सायंकाळीही. एक प्रसंग पुरेसा असतो महानतेची प्रचिती यायला. विनोद सकाळी लवकरच पोहोचायचा. स्टुडिओत खायला प्यायला परवानगी नसते. विनोदला त्याची किती तरी वेळेस कल्पना दिली पण तो काही बदलला नाही. अशा एक ना अनेक गोष्टी. शेवटी चॅनलनं विनोदलाच बदललं. विनोद बेशिस्त आहे का? याच बेशिस्तीनं विनोदला संपवलं का? माईक टायसनच्या कुळातला आहे विनोद?

      सचिन  आणि कांबळी दोघेही गाणी भरपूर ऐकायचे. दौऱ्यावर असतानाही. रात्री उशिरापर्यंत कांबळींच्या रूममध्ये आवाज यायचा. सचिनचा लवकरच थांबायचा. सचिन सकाळी प्रॅक्टीससाठी हजर असायचा तर कांबळीची दांडी. परिणाम आपल्यासमोर आहे. सचिन विक्रमादित्य तर विनोदला ओहोटी. विनोदच्या डोक्यात यशाची हवा गेली? सचिननं नवनवे kambli 1.jpg विक्रम केले पण तो कायम भुकेला दिसला? विनोदची भूक लवकरच संपली? मध्यमवर्गीय मुलांना यश मिळालं की ते समाधानी होतात आणि कायमचे संपतात.

      मोजता न येणारा पैसा खोऱ्यानं मिळतो. स्वप्नातल्या बायका प्रत्यक्षात अवतरतात, फार कमी मध्यमवर्गीय मुलं यातून सहीसलामत सुटतात, काही अडकतात? सचिन आणि विनोदचं वर्गीकरण या दोन्हीत करता येईल? अपयश अनाथ असतं आणि यशाला बाप अनेक. नऊ वेळेस कमबॅक करणाऱ्या विनोदलाही ही पट्टी लावता येईल?

           शाहरूख खान असो की अमिर खान, हे काही शतकातले महान कलाकार नाहीत. पण आपल्या जवळ जे “एवढूसं” आहे ते कसं जपायचं आणि दाखवायचं त्याचं “एवढं” मोठं डोकं त्यांच्याकडे आहे. त्याच्या मुलाखती ऐकल्या की त्याची प्रचिती येतेच. विनोद कांबळीसारखी गुणी पोरं यात कमी पडतात का? प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याच्या पातळीएवढी यशाची लाट येतेच, पण प्रत्येकाला ती समजतेच असं नाही. ज्यांना त्या लाटेवर स्वार होता येतं ते पुढच्या लाटेत फेकले जातात तर इतर पहिल्याच लाटेत गटांगळ्या खातात. Some survive better than others. विनोदबाबतही असच घडलं असावं का? या रांगेत विनोद एकटा आहे, असं म्हणावं की तुमच्या माझ्यासारखे कित्येक जण?

      बोरीस बेकर आणि स्टेफी ग्राफ हे माझे आवडते टेनिसपटू. मला टेनिस फार कळत नाही पण बेकरच्या कारकिर्दीचा विनोद झाला तर स्टेफीच्या कारकिर्दीचा सचिन. विश्वास बसत नाही की स्टेफी आणि बेकर एकत्र प्रॅक्टीस kambli.jpgकरायचे. बेकरबाबत मी आजही काही वाचलं, ऐकलं की हळवा होतो रूखरूख लागते जशी विनोदबद्दल. पण त्यांच्या पराभवाचं काय? की यशाला चौकट बिकट काही नसते? तिला नसते नियती आणि कसलीच वासना? यश हे यश असतं. ना आघाती आणि ना अपघाती ? का यश अपयशाची तुलनाच फुटकळ, जिंकणारे जिंकतात हारणारे हारतात. काहींच्या नशीबात यश आणि यशच आणि काहींच्या नशीबात पराभवाचे फेरे?

      पण  असं म्हणून सगळी संकटं, माणसं अंगावर घेऊन जिंकणाऱ्या आयन रँडच्या रोअर्कवर किंवा गेल वायनँडवर आपण अन्याय तर करत नाहीत ना? उसेन बोल्ट, मायकल शूमाकर, रॉजर फेडररसारखे जगज्जेते यात मोडतात का?  उसेन  बोल्टनं तर वीज चमकवलीय. त्याच्याबद्दल वाचताना वाटलं, साल्यासोबत आपणही पळायला पाहिजे. काय हरकत आहे. आपण शेवटून पहिले येऊ फार तर. पण बोल्टच्या सोबत स्पर्धा केली हे काय कमी आहे?

काही  पराभव यशापेक्षा किती तरी  मोठे असतात. खरं तर सकाळी लवकर उठणंसुद्धा मला जमत नाही. पण काही तरी वाटणं हाच तर जिवंतपणा. असमाधानी असण्याची पहिली खूण. गालिबच्या शब्दात, gulal.JPG

      हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पर दम निकले बहुत निकले मेरे अरमाँ फिर भी क्यूँ कम निकले…..

मला स्वत:ला असं वाटतं की माणूस एकदा हवं ते मिळवण्यात समाधानी झाला की तो संपला, हे बेसिक. बाकी इतर गोष्टी लढण्याच्या. अपयश येत नाही असं नाही पण “चल साले की बजाते है” म्हणण्याची हिंमत असलीच पाहिजे. तुम्हाला “गुलाल” मधला रणसा आठवतो. तो दहा वेळेस मार खातो पण अकराव्या वेळी मारण्याची हिंमत ठेवतो. तो एकदा म्हणतोही, देने गये थे, बना, पर लेने पडे पण म्हणून काही रणसाचं महत्व कमी होत नाही.

      विनोदला जर निवृत्ती जाहीर करेपर्यंत असं वाटलं असेल की मिळाली संधी तर देऊ दणका तर तो ग्रेटच. तो रणसा. पण यातलं काहीच नसेल तर आयुष्य म्हणजे गाठोडं. न सुटलेलं. श्वास जड करणारं. 

माझा मित्र कायम मला चिडवतो की, तुमच्या मुंबईला एका हिंस्र नेत्याची कायम गरज असते. बाळ ठाकरे झाले आता त्यांची जागा त्यांचा पुतण्या घेतोय. पुस्तकांच्या जशा सुधारून वाढवलेल्या आवृत्या असतात तशी राज ठाकरे ही बाळ ठाकरे यांची सुधारून बिघडवलेली आवृत्ती आहे. दुख-या मराठी मुंबईकरांना राज ठाकरे नावाचा नवा हिंस्र नेता आता लाभलाय. तो किती काळ पावेल ते आता बघायचं.
अनेक सुुबुद्ध मराठी माणसांनी , ‘ राजची मेथड नाही पण मॅडनेस ‘ कुठं तरी पटतोय, असं सांगितलंय. मुंबईत मराठी मुलांना नोक-या मिळत नाहीत, त्यांना डावललं जातंय, भय्यांची अरेरावी चाललीए, मुंबईचं कॅरेक्टर मराठी नाही, इंग्रजी नाही तर युपी – बिहारचं बनत चाललंय, भोजपुरी हिरो इथं फेमस होतायत, आमच्या मराठी पोरीही हिंदी बॉलिवुडमध्ये जाऊन युपी बिहारवाल्यांची गाणी गातायत. भय्यांना धडा शिकवण्याची गरज सुबुद्ध मराठी मध्यमवर्गीय लेखकांनीही मान्य केलीए पण राजची दणका मेथड मात्र बरोबर नाही हे त्यांनी सांगितलं.
राजच्या भल्या भल्या टीकाकारांनाही मुबईत मराठी भाषिकांना डावललं जातंय हा मुद्दा पटलेला आहे. मराठी मुलांपुढे आज बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. मराठी मुलांना अपेक्षेप्रमाणे नोक-या मिळत नाहीएत. मनसेनं या मूळ दुख-या भावनेचं राजकारण केलंय. मुंबईतला मराठी टक्का घसरतोय हे सत्य आहे. खरंतर हा टक्का 1960मध्ये वाढण्याचं कारण होतं गिरणी कामगार. जे राज ठाकरे, आज ज्या मराठी माणसाचं तथाकथित नेतृत्व करायला पुढे येतायत त्या मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करायला, त्याची सशक्त गिरणी कामगार संघटना मोडून काढायला पहिली सुरु वात बाळ ठाकरे यांनीच केली होती. कृष्णा देसाई खून आणि त्यानंतरचं शिवसेनेचं राजकारण हे मराठी माणसांची युनियन कमकुवत करण्याचं राजकारण होतं. मानभावी काँग्रेसनं आणि शिवसेनेनं ते खेळलेलं आहे.
एक लक्षात घेऊ या, मुंबईतला कोळी आग-यांचा वर्ग सोडल्यास प्रत्येक मुंबईकर उपरा आहे. 1960 पर्यंत इथला श्रमिक मुंबईकर मराठी होता. या श्रमिक मराठी मुंबईकराला, वैश्य मुंबईकरानं कायम डावलंलं होतं. आज मुंबईतल्या ‘ कॉस्मॉपॉलिटन कॅरेक्टर ‘ बद्दल अहमहमिकेने बोलणारे अनेकजण हा मुद्दा विसरतात. सुकेतू मेहताच्या ‘ मॅॅक्झिमम सिटी ‘ मध्ये मुंबईतला मराठी म्हणजे ‘ घाटी ‘ याचं सविस्तर वर्णन आहे. कामवाली बाई, घरगडी रामा हाच मराठी वर्ग मारवाडी गुजराती घरात अभिप्रेत होताए या विषयी सुकेतू मेहतानं लिहिलंय. मराठी माणसाच्या मुंबईतल्या न्यूनगंडाची बीजं या वर्गीय तफावतीत आहेत.
मुंबई हे भारतातलं पहिलं वैश्य शहर. या वैश्य शहरात सर्व दलित कामं साठच्या दशकापर्यंत मराठी माणसानं केली. कम्युनिस्ट ट्रेड युनियननी गिरणी कामगाराला न्याय दिला तरी महाराष्ट्राच्या इतर भागातून पोटापाण्यासाठी मुंबईत येणारा, झोपडपट्टीत राहणारा, दलित, दलितेतर मराठी वर्ग कायम उपेक्षित होता.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणूनच एकिकडे मराठी समाजवादी मध्यमवर्गाचा आणि दुसरीकडे संघटित कामगारांचा लढा दिसतो. उरलेल्या नेतृत्वहीन मराठी जनतेला 1969 मध्ये बाळ ठाकरे मिळाले. शहारातल्या लुंपेन, गुजराथी मारवाड्यांनी नाडवलेल्या मराठी जनतेला ‘ बाळसाहेबांची ‘आक्रमकता भावली.
शिवसेना आणि त्यांचं जातीय हिंस्र राजकारण समजून घेताना हा स्थानिक विरुद्ध उपरे हा वाद किती कॉम्प्लेक्स आहे, हे समजून घ्यायला हवं. 60 नंतर मुंबई महाराष्ट्राची झाली. नावापुरती. पण या शहराची सूत्रं ज्या धनिक वर्गाच्या हातात होती तो धनिक वर्ग ‘ घाटी ‘ जनतेला तुच्छच लेखत होता. मराठी न्यूनगंडाची , नाकारलेपणाची विषवल्ली 1960 नंतर अधिक जोमानं फोफावली.
आता आपण 2007 मधलं वातावरण बघतोय. मनमोहननं 1991 मध्ये आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाची दारं उघडलीएत, ट्रेड युनियन नेस्तनाबुत झाल्यायत, एकेकाळचे गुंड सन्माननीय राजकारणी बनलेत. राजकारण गुंडांच्या ताब्यात आहे हे स्पष्ट आहे. एकदा foundational crime करून हे गुंड आता मान्यवर झाले आहेत. आपापले मतदारसंघ टिकावणा-या देशमुख – पाटील राजकारण्यांना मुंबईची पर्वा नाहीए आणि मुंबई पालिकेवर डरकाळी फोडणारा ढाण्या वाघ आता थकलाय. तो आता पूर्वीसारखा मराठी माणसाच्या रक्षणाला पुरा पडेल असं दिसत नाहीए.
दरम्यान मुंबई नावाच्या मॅग्नेटनं बिहार युपीतल्या दुष्काळग्रस्त, भुकेकंगाल कामगाराला मुंबईच्या दिशेनं ढकललंय. विकासातल्या असमतोलामुळं त्याला दुसरा पर्यायच ठेवलेला नाहीए. मुंबईतला जुना मराठी कामगार वर्ग आता मध्यमवर्ग झालाय. नव्या मराठी स्थलांतरितांना आता युपी बिहारवाल्यांशी झुुंजावं लागतंय. आणि फाडफाड इंग्रजी बोलणारा मलबार हिल क्लास , त्याच्या खिसगणतीत मराठी माणूसच नाहीए. इंग्लिश मीडियम मधल्या मराठी कॉन्व्हेंट कन्व्हर्टला त्यानं मॅनेज केलंय पण नवा लुंपेन मराठी , छे! तो त्यांना नकोय.
जागतिकीकरणानं जगभर आपले ऑक्टोपसी हातपाय पसरलेत. यातनं नाकारल्या गेलेल्यांची संख्या मोठी आहे. मंुबईत असंघटित युपी बिहारी कामगार, मराठी कामगार, तमिळ, तेलगु कामगार सारेच भरडले जातायत. त्यातल्या मराठी कामगारांना आपल्याच भाषेच्या जोरावर संघटित होता येतंय. त्यांचा म्होरक्या झालाय राज ठाकरे !
दुदैर्वाची गोष्ट अशी या असंघटित, नाडलेल्या, सर्व्हिससेक्टरमध्ये खस्ताखाणा-या उदाहरणार्थ बारा तास तुमच्या गाडीवर राहणा-या ड्रायव्हरपासून ते 100 कपडे दर दिवसाआड इस्त्री करून आणणा-या धोब्यापर्यंत कुणाचीही खरी पर्वा राजला नाही. त्याच्या डोक्यात फक्त राजकारण आहे. त्याला न्यूनगंडाचं ठसठसणारं गळू नीट दिसलंय.
तुम्हीही नीट डोळे रोखून राजकडे बघा. मराठी गिरणीकामगाारांना देशोधडीला लावून काबीज केलेली कोहिनूर मिल त्याच्याकडे आहे. या ठाकरे कुटुंबियांकडे एवढा पैसा कुठून आला ? हे पण आम्ही आता विचारू शकत नाही.
शिवाय ‘ चलेजाव ‘ची घोषणा राज ठाकरेंच्या सवयीची आहे. रमेश किणींनाही त्यांनी तेच सांगितलं होतं. बिचारे किणी त्यांना आठवायला आता कोणाला वेळ आहे? शिवसेनेतल्या धनुष्यातला हा ब्रोकन अ‍ॅरो आता मराठी माणसाचं कल्याण करणार आहे की स्वत:ची राजकीय प्रतिमा उंचावणार आहे ते काळच ठरवेल. एवढं खरं की आता मराठी माणसाचा धीर सुटलाय. हिंसेचं वावडं त्याला वाटत नाहीए. त्याला राज ठाकरेचं वावडंही वाटत नाहीए.
एकेकाळी खोमोनीवर विश्वास ठेवणा-यांनाही तसं वाटत नव्हतं. पण हिंसेचा आधार घेणारा कोणताच समाज जगात टिकू शकत नाही. त्याला नाकारण्याकडंच सर्वांचा कल राहतो. आर्थिक गणिताचं भान नसलेला राज ठाकरेसारखा नेता मराठी माणसासाठी फार काही करू शकणार नाहीए.
प्रश्न आहे पैशांच्या भाषेचा. त्याला मराठीचा, देवनागरीचा बनवून आपण सुरेख गंडवले जातोय. हेच चाळीस वर्षांपूर्वी नव्हतं का झालं? हिस्ट्री रिपीट्स अ‍ॅण्ड हिस्टॉरिकल मिस्टेक्स रिपीट विथ अ‍ॅब्सोल्युट सर्टनटी!
मुंबईतला हा नवा टायगर आहे की मॅन-इटर ते काळच ठरवेल.
ज्ञानदा www.ibnlokmat.com

जनतेला प्रस्थापितांना धक्का द्यायचा असतो…त्यासाठी ती पर्याय शोधत असते…भोवतालच्या सगळ्या व्यवस्थेला मी बदलू शकत नाही…पण यातही काही आशादायी आहे…ती आशा तेवत ठेवण्याचं काम मी करेन’…राजू शेट्टी ‘आयबीएन लोकमत’च्या कार्यक्रमातून निकालाच्या दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राला शब्द देत होते…तेव्हा प्रत्येक सह्रदय प्रेक्षकाच्या डोळ्यात आनंदाने पाणी आल्याशिवाय राहिलं नसेल…आणि जे राजूला जवळून ओळखतात त्यांना राजू हा शब्द पाळेल याची खात्रीच वाटत असेल.

 

पंधराव्या लोकसभेच्या निकालाचं वैशिष्ट्य काय?, असा प्रश्न जर तुम्हांला पडला तर राजू शेट्टीचा विजय आणि राहुल गांधीचा उदय असं मनात नि:संशयपणे ठरवून टाका. लक्षात घ्या…एकाच हुन्नरचे पण प्रचंड भिन्न पार्श्वभूमीचे दोन नेते या निकालाने आपल्याला दिलेत…त्यांचं राजकारण विकासाच्या प्रश्नांना घेऊनच मोठं आणि यशस्वी झालेलं आहे आणि जर ते याच दिशेनं चाललं तर भारतीय राजकारणातला मागच्या 20 वर्षांचा धार्मिक आणि जातीय राजकारणाचा ट्रेंड आणि त्या जीवावर राजकारण करणारे नेते यांचं भवितव्यच संपू शकतं. निदान एवढा विश्वास या निकालातून या दोन्ही नेत्यांनी आपल्याला दिलाय.

 
राजू, राहुल गांधींसारखा प्रसिद्धीचं वलय घेऊन जन्माला आलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातलं तालुक्याचं ठिकाण असलेल्या शिरोळ गावचा राजू. शेतकरी कुटुंबातला. शेतकर्‍याला लुटणारे सावकार, त्यांच्याच पतसंस्था आणि गावागावातल्या सोसायट्यांवर याच सावकार कम नेत्यांचं असलेलं वर्चस्व या सगळ्याला विटून राजू शरद जोशींच्या शेतकरी संघटनेकडे आकर्षित झाला. पण नंतर पुढे राजूचे शरद जोशींशी मतभेद झाले. राजूचा स्वभाव आक्रमक. भाषण अंगार फुलवणारं…आजही तो काळजाला हात घालणारं बोलतो…पण, म्हणजे भावनेचं राजकारण तो करत नाही…’ऊसाचा दर ह्यांनीच ठरवायचा…किमान हमी दर द्यायचा…आणि साखर विकून येणार्‍या नफ्याचा फायदा मात्र शेतकर्‍याला त्या नफ्याच्या पटीत द्यायचा नाही… याउलट सहकार चळवळीचे नेते म्हणून राज्यभर टोपी घालून मिरवायचं…गावखेड्यातून आलेला हा माणूस सहकार चळवळ मातीमोल करणार्‍या नेत्यांवर हल्ला चढवतो तेव्हाच त्याने सभा जिंकलेली असते…पण राजू सभेपुरताच थांबत नाही…आमदार म्हणून निवडून आल्यावर काँग्रेस सरकारला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होणं त्याला शक्य होतं…पण तो विरोधी बाकांवर बसला…वामनराव चटपांच्या बाजूला बसून सभागृह कामकाजाचे नियम समजून घेणारा राजू विधानसभा कव्हर करणार्‍या अनेक रिपोर्टर्सनी पाहिला आहे. दूध प्रश्नावर त्याने जेव्हा दूधबंद आंदोलन केलं तेव्हा मुंबईतल्या काही मुखंडांनी आपल्याला दूध मिळत नाही म्हणून राजूवर टिकेची झोड उठवली होती. पण राजू बधला नाही. शेतकर्‍याची परिस्थिती तो आकडेवारीसह मांडत राहिला. ‘तिकडे शेतकर्‍याचं पोरगं घरात दूध असूनही मसाल्याला पै नाही म्हणून मरतंय’…तेव्हा त्याच्यासाठी इतका टाहो का फुटत नाही’, असा जळजळीत सवाल विचारत राहिला. जेव्हा राजूकडे सहज गप्पांना जाऊन बसण्यासाठी वेळ मिळतो तेव्हाही त्याच्यातला आणि इतर राजकारण्यांतला फरक जाणवतो. एक किस्सा सांगतो…यावेळची आचारसंहीता लागू झाली नव्हती…पण ठिकठिकाणचे उमेदवार कोण असतील याची कुजबूज सुरू झाली होती. सहज फोन केला तेव्हा राजू त्याच्या आकाशवाणी आमदार निवासावर असल्याचं कळलं… तिथे गेलो आणि गप्पा जेव्हा हातकणंगल्यातल्या उमेदवारीवर आल्या तेव्हा …’छे हो…कोणाला खासदार व्हायचंय हिथं…हाय तेच बरं हाय की..’ असं टिपीकल नेत्यासारखं राजू सांगायला लागला…तोवर बसपाने त्याच्याशी उमेदवारीसाठी संपर्क साधला होता याची कुणकुण होतीच…त्याबद्दल विचारलं तेव्हा मात्र तो चाचपला…आणि मग, बोलता झाला…’राहिलं पाहिजे हो…देशातल्या संसदेत गरीबाचा आवाज पोहोचला तर फायदा…मोठं व्यासपीठ मिळतं…निवडून येईन ही खात्री आहे…पण निवडणूक लढवायची काय सोपं काम आहे काय’..ज्या काळात इतर उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठीच्या यंत्रणेची काळजी नसते पण निवडून यायची खात्रीही नसते अशावेळी वर्तमानाच्या प्रवाहात उलट वाहणं पण सामान्य माणसाच्या राजकीय आकांक्षांचं राजकारण करणारा राजू उठून दिसतो…लक्षात राहतो…
राहुल गांधीही असंच लक्षात ठेवणारं राजकारण करतोय…इथे राजूची आणि राहुलची तुलना करायची नाही…दोघांची स्केल्स वेगळी आहेत…आजसुद्धा त्यांची बॅटलग्राऊंड्स सारखी नाहीत…पण राहुलने ज्या पद्धतीने मंडलवादात भरकटलेल्या काँग्रेसला बाजूला काढून गंगेच्या खोर्‍यात किनार्‍याला लावलं ते बघता राहुल व्यापक स्तरावर ही विकास आणि स्थिरतेची लाईन सोडणार नाही असंच दिसतंय. राहुलकडे राजूसारखा ग्राऊंड लेव्हलचा जिवंत अनुभव नाही पण सोबत जी माणसं त्याने घेतली आहेत ती फिरणारी आहेत…’द हिंदू’ या दैनिकाचे ग्रामीण भागाबद्दलचे संपादक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ राहुलचे जवळचे सल्लागार मानले जातात. (थोडं विषयांतर करून सांगतो…याच साईनाथांचा विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांवरचा रिपोर्ट महाराष्ट्रातल्या काँग्रेस आघाडीने मानला नाही. उलट, नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमली आणि साईनाथांचे निष्कर्ष खोटेही ठरवले. नंतर साईनाथ विरूद्ध जाधव असा लेख संघर्षही झाला तेव्हा या संघर्षात हस्तक्षेप करण्याचं भानही राज्यातल्या ‘जाणत्या’ पुढार्‍यांना झालं नाही.) साईनाथ यांच्यासोबत राहुल विदर्भात फिरून आला…त्याचा फायदा पक्षाला यावेळी झाला…मधल्या काळात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढूनही एकूण 5 खासदार या भागातून निवडून आले. (गेल्यावेळी काँग्रेसचा एकच खासदार इथून आला होता…) तीच परिस्थिती उत्तर प्रदेशातली. इथल्या मुस्लिम-दलित मतदाराचा सपा-बसपाकडून भ्रमनिरास झालाय हे राहुलच्या चांगल्या सल्लागारांनीच त्याला सांगितलं असणार. त्यामुळेच राहुलच्या युपीतल्या फेर्‍या वाढल्या. त्यातही तो जास्तकरून पश्चिम युपीत फिरला. या भागातल्या साखर पट्‌ट्यातल्या समस्या समजून घेत त्याने काँग्रेस आणि खासकरून जनतेपासून तुटलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना रस्त्यावरच्या माणसापर्यंत पोहोचवलं…राहुल जिथे गेला तिथे तो प्रश्न समजून घेण्याच्या, जाणून घेण्याच्या इराद्याने गेला आणि यशस्वीही ठरला…पक्षानं स्वबळावर लढावं…वेळ पडली तर विरोधी पक्षात बसावं…पण स्वत:ची ताकद वाढवावी…आघाडीचं राजकारण ही तडजोड आहे…पण ते ताकद वाढवणारं राजकारण नाही…पक्षातल्या तरूण तुर्कांच्या सोबतीने ही गोष्ट राहुलनेच ज्येष्ठांच्या, डिसीजन मेकर्सच्या मनात बिंबवली…आणि त्याचा फायदा म्हणून आज काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला.
एक गोष्ट मात्र अजून स्पष्ट व्हायची आहे…जनतेनं आज या दोघांनाही आपलं मानलंय…पण, हे आपलेपण टिकवण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच टाकलीय. काँग्रेसला आणि विशेषत: राहुलना आता रिझल्ट्स दाखवावे लागणार आहेत..तो मंत्रीमंडळात सामील झाला तर त्या खात्याचा बोलबाला होणारच…पण काम करून झालेला बोलबालाच जनता मानणार आहे…त्या अर्थाने राहुलची यापुढची वाट अधिक जबाबदारीची असणार आहे..राजूची गोष्ट थोडीफार वेगळी आहे… राज्याच्या सभागृहात यशस्वी होणं आणि देशाच्या सभागृहात नाव कमावणं यात काही फरक आहे…राजू काम करायला हटणारा नाही…पण ‘संसदेच्या कॉरिडॉर्समधून चालताना खूप चलाख रहावं लागतं,’ असं नरसिंहराव त्यांच्या ‘इन्सायडर’ या आत्मचरित्रात म्हणतात. म्हणजेच राजूला सतर्क रहावं लागणार आहे. एकंदरीत राहुलकडे करीष्मा आहे…त्याला काम दाखवावं लागणारेय तर, राजूकडे काम आहे आता त्याला कामातून येणारा करीष्मा कमवावा लागणार आहे…आपापल्या जागेवर त्यांच्यासाठी ते अपरिहार्य आहेत शिवाय आता जनता त्यांच्याकडे बघताना याच बाबींचा विचार करणार आहे…
राजू आणि राहुल हे दोघेही यात यशस्वी झाले तर मग, देशाच्या राजकीय जीवनात दोन तरूण नेत्यांची समृद्ध कामगिरी बघण्याचा योग आपल्याला येईल.

– अमेय तिरोडकर http://www.ibnlokmat.com

मला गेल्या काही काळात राहून राहून एक प्रसंग आठवतोय. तो आहे गुंथर ग्रास यांचा. ग्रास हे जगप्रसिद्ध जर्मन लेखक. 1997 ला ते भारतात आले. कोलकात्त्याच्या झोपडपट्टीत राहिले. भारतावर काही पुस्तकही त्यांनी लिहिली. त्याच वर्षी देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत होता. एवढा मोठा लेखक भारतात आहे आणि त्याला निमंत्रण नाही असं कसं होईल. वाजपेयींनी त्यांना 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलवलं. पण ग्रास काही आले नाहीत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. माध्यमांनीही विचारपूस केली. पण ग्रास काही बोलले नाहीत. शेवटी भारत सोडून जाताना ग्रास जे बोलले ते अस्वस्थ करणारं आहे. ते म्हणाले, भारतात दैन्य आणि दारिद्र्याचा महासागर आहे आणि त्याच महासागरात एका रात्रीला लाखो करोडो रूपये खर्च करणारे निर्लज्ज बेटही आहे. बेटांचा आणि महासागराचा संबंध क्षणोक्षणीचा, पण भारत हा असा एक अतर्क्य देश आहे. जिथे या दोन्हीचा कधीच संबंध येत नाही.

मला गेल्या काही काळात राहून राहून एक प्रसंग आठवतोय. तो आहे गुंथर ग्रास यांचा. ग्रास हे जगप्रसिद्ध जर्मन लेखक. 1997 ला ते भारतात आले. कोलकात्त्याच्या झोपडपट्टीत राहिले. भारतावर काही पुस्तकही त्यांनी लिहिली. त्याच वर्षी देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत होता. एवढा मोठा लेखक भारतात आहे आणि त्याला निमंत्रण नाही असं कसं होईल. वाजपेयींनी त्यांना 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलवलं. पण ग्रास काही आले नाहीत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. माध्यमांनीही विचारपूस केली. पण ग्रास काही बोलले नाहीत. शेवटी भारत सोडून जाताना ग्रास जे बोलले ते अस्वस्थ करणारं आहे. ते म्हणाले, भारतात दैन्य आणि दारिद्र्याचा महासागर आहे आणि त्याच महासागरात एका रात्रीला लाखो करोडो रूपये खर्च करणारे निर्लज्ज बेटही आहे. बेटांचा आणि महासागराचा संबंध क्षणोक्षणीचा, पण भारत हा असा एक अतर्क्य देश आहे. जिथे या दोन्हीचा कधीच संबंध येत नाही.  • प्रशांत पाटील.: जवळपास सगळ्यांच्याच मनातली गोष्ट ऊघडपणे आपण मांडली आहे.
  • sandip: Khupch chhan kavita aahet
  • dinesh chavhan: namskar, kusumagraj yanchi kavita,internet var aalyane khup aannand zala.marathi madhale abhijat sahitya netvar yave hi kalachi garaj zali aahe.tumch

प्रवर्ग